Bhandara Hospital Fire | भंडारा शासकीय रुग्णालयातील आगीला जबाबदार कोण? राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह

देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेमुळे रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेबाबत काही प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:36 AM, 9 Jan 2021
Bhandara Hospital Fire | भंडारा शासकीय रुग्णालयातील आगीला जबाबदार कोण? राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह

भंडारा: संपूर्ण देशाला हादरवणारी घटना भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील लहान मुलांच्या युनिटमध्ये घडली आहे. रुग्णालयातील शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बाळांचा मृत्यू झालाय. शुक्रवारी मध्यरात्री 2च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. धुरामुळे गुदमरुन या बाळांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. (Who is responsible for the fire incident at Bhandara District Hospital?)

लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं तिथं कामावर असलेल्या नर्सच्या लक्षात आलं. तिनं दार उघडून पाहिलं असता अतिदक्षता विभागात धुराचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा तातडीनं रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांना याची माहिती देण्यात आली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने अतिदक्षता विभागातील बाळांना बाहेर काढलं. दरम्यान, 10 बाळांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. तर 7 बाळांना वाचवण्यात यश आलं आहे.

देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेमुळे रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेबाबत काही प्रश्न उपस्थित होत आहेत.

1. भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील 10 बाळांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

2. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग कशी लागली?

3. दुर्घटनेवेळी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी काय करत होते? SNIC युनिटमध्ये त्यावेळी कुणी उपस्थित नव्हतं का?

4. सरकारी रुग्णालयातील निष्काळजीपणा, उपचार यंत्रणा आणि आरोग्य उपकरणांमधील त्रुटी याला जबाबदार आहेत का?

5. प्राथमिक दृष्ट्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सरकारी रुग्णालयातील उपकरण आणि वायरिंगची वेळोवेळी तपासणी केली जात नाही का?

6. सरकारी पातळीवरुन या घटनेची दखल घेऊन, या दुर्दैवी घटनेला जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई केली जाणार का?

7. राज्य सरकारकडून मृत बालकांच्या नातेवाईकांना मदत दिली जाणार का? आणि किती मदत मिळणार?

8. अशा दुर्दैवी घटना घडल्यानंतर पाहणीच्या सोपस्काराव्यतिरिक्त आरोग्य विभाग काय उपाययोजना करणार?

9. पुढील काळात सरकारी रुग्णालयांमध्ये अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी आरोग्य विभाग काय खबरदारी घेणार?

10. रुग्णालयातील दुर्घटनेची पाहणी करुन, मृत बालकांच्या नातेवाईकांना दिलासा देऊन, आरोग्य यंत्रणेतील त्रुटीकडे दुर्लक्ष कसं करणार?

आरोग्यमंत्र्यांकडून दुर्घटनेची माहिती

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपूर्ण घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी म्हटलंय. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करुन अन्य रुग्णांना दुसरीकडे हलवण्याचे आणि लागेल ती मदत पुरवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

BREAKING | भंडाऱ्यात देश हादरवणारी घटना, सरकारी रुग्णालयात आग, 10 बाळं दगावली

Who is responsible for the fire incident at Bhandara District Hospital?