नाफेडच्या कांदा खरेदीवरून सभागृहात गोंधळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देतांना संतापले…

नाफेड कडून कांदा खरेदी सुरू आहे की नाही यावरून सभागृहात आज सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले होते. कांद्याच्या मुद्द्यावरून मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.

नाफेडच्या कांदा खरेदीवरून सभागृहात गोंधळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देतांना संतापले...
Image Credit source: Google
| Updated on: Mar 09, 2023 | 12:59 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी ( Onion Farmer ) मोठ्या संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. हाच मुद्दा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही गाजत आहे. अशातच राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वारा आल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे विरोधकांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही यावेळेला आक्रमक झाले होते. यावेळी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) चांगलेच संतापले होते.

नाफेड कडून कांद्याची खरेदी कुठे सुरू आहे, त्याची केंद्रे कोणती आहे ? असा सवाल विचारात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले होते. त्यावरून उत्तर देत अस्तानण मुख्यमंत्री विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर देत असतांना विरोधकांवर चांगलेच संतापले होते. विरोधक आक्रमक झाल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी पाठीमागील सरकारने काहीच मदत केली नाही म्हणत केलेल्या मदतीवर भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देत असतांना, नाफेडची खरेदी सुरु झालेली आहे. सगळीकडे नाही तर काही ठिकाणी नाफेडची खरेदी सुरु झालेली आहे. या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असे म्हंटले आहे.

याच वेळी छगन भुजबळ यांनी दिलासा कधी देणार असा सवाल उपस्थित केला. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतापले होते. बोलत असतांना शिंदे म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांना बारा हजार कोटी रुपये दिले.

तुमच्यासारखी शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली नाहीत. आणि कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये दिले, तुम्ही जाहीर करून नाही दिले ते आम्ही दिले असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला.

कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार न्याय देईल असे सांगत क्विंटलनुसार न्याय देऊ असे शिंदे यांनी सांगत शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार खंबीर पणे उभे राहील असा विश्वास व्यक्त केला आहे. याशिवाय शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगत विरोधकांना टोला लगावला आहे.

दरम्यान विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात नाफेड कडून केली जाणारी खरेदी यावरून मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.