Buldana Shiv Sena : खासदार प्रतापराव जाधव यांची जिल्हा संपर्कप्रमुख हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे 7 जणांना शिवसेनेतून काढले

बुलडाणा जिल्ह्यातील खासदार आणि दोन आमदार शिंदे गटात गेलेत. बहुतेक पदाधिकारी हे आमदार व खासदार यांच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यामुळं शिंदे गटातच बहुतेक शिवसैनिक गेलेत.

Buldana Shiv Sena : खासदार प्रतापराव जाधव यांची जिल्हा संपर्कप्रमुख हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे 7 जणांना शिवसेनेतून काढले
खासदार प्रतापराव जाधव यांची शिवसेनेतून हकालपट्टी
| Edited By: | Updated on: Jul 24, 2022 | 4:59 PM

बुलडाणा : बुलडाणा जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पदावरून खासदार प्रतापराव जाधव यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने त्यांची शिवेसना पक्षाच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त रविवार 24 जुलै 2022 रोजी शिवसेनेचे अधिकृत मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून प्रसिद्ध करण्यात आले. मंगळवारी 19 जुलै 2022 रोजी शिवसेनेच्या 12 खासदारांनी गट तयार केला. 12 खासदारांचे पत्र लोकसभा सभापतींना देऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) गटाला पाठिंबा दिला होता. जिल्ह्यातील काही शिवसेना पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेतली. जिल्हा प्रमुख शांताराम दाणे (Shantaram Dane) यांनी आम्ही खासदार प्रतापराव जाधव यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले होते.

कुणाकुणावर कारवाई

सामना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जिल्हा संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांना पदावरून कमी करण्यात आले. जिल्हा प्रमुख शांताराम दाणे (मलकापूर जळगाव जामोद, विधानसभा) उपजिल्हा प्रमुख राजू मिरगे, उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, तालुका प्रमुख नांदुरा संतोष डिवरे, तालुका प्रमुख मलकापूर विजय साठे, तालुका प्रमुख शेगाव रामा थारकार यांनी पक्षविरोधी कारवाई केली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी केली. त्यांच्या जागीसुद्धा नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

आणखी कुणाकुणाची हकालपट्टी करणार

बुलडाणा जिल्ह्यातील खासदार आणि दोन आमदार शिंदे गटात गेलेत. बहुतेक पदाधिकारी हे आमदार व खासदार यांच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यामुळं शिंदे गटातच बहुतेक शिवसैनिक गेलेत. अशावेळी आणखी कुणाकुणाची हकालपट्टी करणार, असा प्रश्न येथील शिवसैनिक विचारत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेना म्हणजे आमदार व खासदार यांच्याभोवती केंद्रित झाली आहे. खर तर हकालपट्टी करण्यापूर्वीच हे दोन्ही आमदार आणि खासदार शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळं तशीही उद्धव ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना जिल्हात फारच कमी राहिली. बुलडाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.