आरपीएफ जवानाचे प्रसंगावधान, प्लॅटफॉर्म गॅपमध्ये पडलेल्या प्रवाशाला दिले जीवदान

प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी प्रसंगावधान आणि समयसुचकता दाखवल्याने कॉन्स्टेबल राम नारायण सिंह यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

आरपीएफ जवानाचे प्रसंगावधान, प्लॅटफॉर्म गॅपमध्ये पडलेल्या प्रवाशाला दिले जीवदान
| Updated on: Jun 01, 2025 | 9:28 AM

चालत्या एक्सप्रेस ट्रेनमधून एक प्रवासी ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडला असता त्याला रेल्वेच्या जवानाने प्रसंगावधान दाखवत वाचवल्याची घटना काल शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर घडली.
यावेळी ड्युटीवर असलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबल राम नारायण सिंह यांनी प्रसंगावधान दाखवत त्याचा जीव वाचवला.कॉन्स्टेबल सिंह यांनी धाव घेत प्रवाशाला वेळीच मागे खेचल्याने या प्रवाशाला अक्षरश: जीवदान मिळाले आहे. या कॉन्स्टेबलच्या धाडसाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

येथे पाहा पोस्ट –

शुक्रवारी ३० मे रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून ट्रेन क्रमांक 12201 लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेली ‘गरीब रथ एक्सप्रेस’ सुरू झाली तेव्हा एक प्रवासी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करीत होता, पण तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडला. त्यावेळी प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असलेले मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे आरपीएफ कॉन्स्टेबल राम नारायण सिंह यांनी त्या प्रवाशाला पाहीले आणि ते धावत आले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत या प्रवाशाला धरले आणि मागे खेचले, त्यामुळे या प्रवाशाचे प्राण बचावले.

प्रवाशाची मानसिक स्थिती अस्थिर

या प्रवाशाची मानसिक स्थिती अस्थिर असून त्याला समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शन देण्यात आले आहे. कॉन्स्टेबल सिंह यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी प्रसंगावधान, समयसुचकता आणि  धाडस दाखवल्याने कॉन्स्टेबल राम नारायण सिंह यांना खरोखरच “जीवनरक्षक” म्हटले पाहीजे. या धाडसाच्या कृतीचा आदर्श इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी ठेवावा असे म्हणत मध्य रेल्वेने प्रवाशाचे प्राण वाचविणाऱ्या राम नारायण सिंह यांचे कौतुक केले आहे.