Chandrakant Patil: पत्रकारांनी पुन्हा पुन्हा विचारलं, चंद्रकांत दादांनी हात जोडले; नेमकं काय घडलं?
खरात प्रकरणात छत्री धरणाऱ्या रुपाली चाकणकरांना पदावरुन हटवले मग खरातचे पाय धरणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्याबाबत वेगळा न्याय का असा सवाल शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. एकीकडे धंगेकरांनी खरात प्रकरणावरुन डिवचले असताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मौन बाळगले आहे.

Ravindra Dhangekar VS Chandrakant Patil: नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणावरुन राज्याच्या राजकारणातही वादाचे फटाके फुटताना दिसत आहेत. खरात प्रकरणात छत्री धरणाऱ्या रुपाली चाकणकरांना पदावरुन हटवले मग खरातचे पाय धरणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्याबाबत वेगळा न्याय का असा सवाल शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. एकीकडे धंगेकरांनी खरात प्रकरणावरुन डिवचले असताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मौन बाळगले आहे.
पत्रकारांनी पुन्हा पुन्हा विचारलं अन् चंद्रकांत पाटील यांनी हात जोडले!
शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते, तथा उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर खरात प्रकरणावरुन जोरदार निशाणा साधला आहे. परंतु चंद्रकांत पाटील यांनी मात्र धंगेकरांना थेट उत्तर देणे टाळले आहे. आज बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या कार्यक्रमानिमित्त चंद्रकांत पाटील जळगावमध्ये आहेत. यावेळी पत्रकारांनी धंगेकरांच्या टिकेवरुन चंद्रकांत पाटील यांना चारवेळा प्रश्न विचारला. मात्र चंद्रकांत पाटील यांनी याबाबत मौन कायम ठेवले आहे. इतकेच नव्हेतर त्यांनी शेवटी त्या प्रश्नावरुन थेट हात जोडले.
काय म्हणाले होते रविंद्र धंगेकर?
खरात प्रकरणात खरातसाठी छत्री धरल्यामुळे रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले, मग खरातचे पाय धरणारे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीत वेगळा न्याय का? देवेंद्रजी, न्यायाची भूमिका घेताना व्यक्ती पाहून निर्णय होऊ नये. रूपाली चाकणकर यांच्याबाबतीत जो निकष लावला, तोच चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीतही लावला पाहिजे. चंद्रकांतदादांसाठी खरात बाबाने वेगळा टेबल मांडला होता का..? असा खोचक सवाल करत रविंद्र धंगेकर यांनी टिका केली होती.
दरम्यान, आज पुन्हा एकदा रविंद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना खरात प्रकरणावरुन सवाल केले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याच खरात बाबाच्या आश्रमाला कोट्यवधी रुपयांचा शासकीय निधी दिला आणि त्यांच्या पाया पडतानाचे फोटोही समोर आले. रूपालीताईंवर कारवाई होते, मग आपल्याच पक्षाचे नेते असल्यामुळे चंद्रकांत पाटलांना सूट दिली जात आहे का? या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा असा सवाल करत नैतिक जबाबदारी स्वीकारून चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही धंगेकरांनी केली आहे.
