
“एकदा चिन्हावर निवडून आलेल्या पक्षाचा एक गट स्थापन झाला की दुसरा गट स्थापन करता येत नाही. 30 दिवसात त्यात नावे जोडली जाऊ शकतात असे सांगत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वडेट्टीवारांना धानोरकरांच्याच गटात आपले नगरसेवक जोडावे लागतील असं सांगितलं आहे. आम्हाला त्यांच्या गटबाजीचं काही करायचं नाही. मात्र त्यांचे अनेक नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगत जर आम्हाला यश आलं तर महापौर आमचा होईल” असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. विजय वडेट्टीवार यांनी भाजपकडून नगरसेवकांना 1 कोटीची ऑफर होत असल्याचा आरोप केला. त्यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “नेते आता हलक्या कानाचे झालेत. त्यांना कुणीही मूर्ख बनवू शकतं. कोण कशाला पैसे देईल. बेताल वक्तव्ये हा काँग्रेसला जडलेला संसर्गजन्य आजार आहे”
अजित पवार महाविकास आघाडीत येतील असं संजय राऊत यांनी म्हटलं. त्यावर सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. “राजकारणात अनेक दगडांवर पाय ठेवण्याची राजकारण्यांना सवय लागली आहे. दोन दगडांवर पाय आहे, म्हणून पाय घसरेल असं काही होत नाही. अजित पवार समर्थ आहेत. अजित पवार जे काही करतायत त्याच्या क्रिया-प्रतिक्रियांची त्यांना पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे त्यांना याची जाणीव नाही असं म्हणणं अयोग्य आहे. ते जे काही करत असावेत ते सर्वांना विश्वासात घेऊन केलं असेल किंवा जे काही करत असतील, त्याच्या परिणामांची त्यांना पूर्ण जाणीव असेल आणि ते जाणीवपूर्वक राजकारण करत असावेत” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
क्लीन चीट दिली असेल तर त्यांचं नशीब
भुजबळ यांना ईडीने क्लीनचीट दिली. त्यावर मुनगंटीवार म्हणाले की, “ईडी च्या क्लीनचीट बाबत मला काही माहीत नाही. जर क्लीन चीट दिली असेल तर त्यांचं नशीब, त्यांचं काम त्यांच्यासोबत आहे”. “एक तर गट नोंदणी करायला 30 दिवस आहेत आणि दुसरं म्हणजे आम्हाला आमच्या नगरसेवकांवर पूर्ण विश्वास आहे” असं चंद्रपूरमधील भाजपच्या गट नोंदणीवर सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
उबाठाचा महापौर होईल का?
“उबाठाचा महापौर करण्याचा दुर दुर पर्यंत विषय नाही. महापौर होईल तर भाजपचाच होईल, नाहीतर आम्ही विरोधी पक्षात बसू, दुसऱ्या पक्षाचा महापौर करण्यात भाजपच्या नगरसेवकांना कुठलीच रुची नाही” असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.