महाराष्ट्रातून जायचे तामिळनाडूत कांड करायचे… कंबोडियाशीही कनेक्शन; असं काय करायची ती टोळी?

Kidney Racket : काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर आता पोलिसांनी देशातील सर्वात मोठे किडनी रॅकेट उघडकीस आणलं आहे.

महाराष्ट्रातून जायचे तामिळनाडूत कांड करायचे... कंबोडियाशीही कनेक्शन; असं काय करायची ती टोळी?
Kidney Scam
Image Credit source: Google
| Updated on: Dec 31, 2025 | 7:36 PM

चंद्रपूर पोलिसांनी देशातील सर्वात धक्कादायक रॅकेट उघडकीस आणले आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर आता पोलिसांनी देशातील सर्वात मोठे किडनी रॅकेट उघडकीस आणलं आहे. तमिळनाडूच्या त्रिची येथे किडनी काढण्यात येत असल्याचा धक्कादायक खुलासा चंद्रपूर पोलिसांनी केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

किडनी रॅकेट उघड

चंद्रपूर मधील एका शेतकऱ्याने सावकारी जाचाला कंटाळून किडनी विकली होती. रोशन कुडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात मोहाली येथून हिमांशू भारद्वाज या आरोपीला अटक करण्यात आली होती. आरोपी हिमांशू भारद्वाज याची देखील किडनी काढण्यात आल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आलं होतं, त्यानंतर पोलिसांनी हिमांशू भारद्वाज यांने किडनी नेमकी कुठे विकली याचा तपास केला आहे.

तामिळनाडू कनेक्शन समोर

हिमांशूने दिलेल्या माहितीप्रमाणे आर्थिक परिस्थिती खराब झाल्याने हिमांशू किडनी विकण्यासाठी सोलापूर येथील रामकृष्ण सुंचू याच्या संपर्कात आला. सुंचू याने त्याला तामिळनाडूच्या त्रिची येथे पाठवले व तेथे त्याची किडनी काढण्यात आली. त्रिची येथील स्टॉर किम्स हॉस्पीटल चे संचालक डॉ. राजरत्नम गोंविदस्वामी आणि डॉक्टर रवींद्र पाल सिंग याने त्याचे ऑपरेशन केले होते.

एका डॉक्टरला अटक

चंद्रपूर पोलिसांनी डॉक्टर रवींद्र पाल सिंग याला दिल्ली येथून अटक केली होती. मात्र ट्रान्झिट रिमांड दरम्यान दिल्ली कोर्टाने त्याला जामीन देऊन 2 जानेवारीला चंद्रपूर न्यायालयात हजर होण्याचा आदेश दिला आहे. तर त्रिची येथील डॉक्टर राजरत्नम गोविंदस्वामी याला अटक करण्यासाठी चंद्रपूर पोलीस तामिळनाडूमध्ये ठाण मांडून बसले आहेत.

किडनी रॅकेटचे कंबोडिया कनेक्शन

याआधी 10 ते 12 भारतीयांना कंबोडिया येथे किडनी काढण्यासाठी पाठवल्याचे समोर आले होते. कंबोडियाच्या मिल्ट्री हॉस्पीटलमध्ये या लोकांची किडनी काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता भारतातच किडनी विक्रीचं रॅकेट सुरू असल्याचे समोर आले आहे. चंद्रपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाणार असून यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.