
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे यांनी एका पॉडकास्टमध्ये जर महाराष्ट्राचे कल्याण होणार असेल कौटुंबिक भांडणासारख्या क्षुल्लक गोष्टी मी विसरुन जाईन असे म्हटले होते. यामुळे पुन्हा ठाकरे बंधू एकत्र येणार का? याबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा पाहायला मिळत आहे. यावर राजकीय वर्तुळात अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. तसेच मनसे-ठाकरे गट यांची युती झाली तर त्याचे परिणाम काय होतील, याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावरही ते स्पष्टपणे बोलले.
“मी बाळासाहेबांसोबत जवळून काम केले आहे. राज ठाकरे वेगळे होत आहेत, हे कळल्यावर मी १२ वर्षे शिवसेना सोडली, पण कोणाशी बोललो नाही. हे कळल्यावर मी स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना फोन केला. मी त्यांना आठ दिवस शांत राहण्यास सांगितले. ते शांत राहिले, पण दुर्दैवाने जे व्हायचे ते झाले. त्यामुळे जर आता ते दोघे एकत्र आले, तर मला खूप आनंद होईल. माझा पक्ष वेगळा आहे. मी बाळासाहेबांच्या काळातच बाहेर पडलो. पण आमचे शिवसेनेबद्दलचे प्रेम कमी झालेले नाही. सर्व कुटुंब एकत्र आलं, तर खूप चांगले होईल, असे छगन भुजबळ म्हणाले.
यानंतर छगन भुजबळ यांना जर मनसे-ठाकरे गट यांची युती झाली तर परिणाम होतील का, असे विचारले असता ते म्हणाले, “निश्चितपणे परिणाम होईल. शिवसेनेची ताकद वाढेल. दोन कार्यकर्ते एकत्र आले, तरी ताकद वाढल्यासारखे वाटते. हे तर मोठे नेते आहेत. एखादा पडलेला आमदार जरी पक्षात आला, तरी ताकद वाढते.” असे छगन भुजबळांनी म्हटले.
“कार्यकर्त्यांची इच्छा असते आणि ते थेट बोलू शकत नाहीत, म्हणून ते प्रेमापोटी बॅनर लावतात. त्याचा फारसा परिणाम होत नाही. तुमच्याकडे बातम्या सुरू झाल्यावर परिणाम होतो, हे खरे आहे. माझे आयुष्य अजित पवारांवर सोपवले आहे. कार्यकर्ते कधीकधी बॅनर लावतात”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी नाशिकमधील बॅनरवर दिली.