ठाण्यातील नळपाडा एसआरए प्रकल्पाला नागरिकांचा विरोध, जितेंद्र आव्हाड यांचा आंदोलनाचा इशारा

ठाण्यातील माजीवाडा नळपाडा येथील एसआरए प्रकल्पाचा वाद वाढत चालला आहे. या प्रकल्पाच्या नागरिकाच्यावतीने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एसआरए कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांना आज जाब विचारला आणि आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ठाण्यातील नळपाडा एसआरए प्रकल्पाला नागरिकांचा विरोध, जितेंद्र आव्हाड यांचा आंदोलनाचा इशारा
| Edited By: | Updated on: Sep 25, 2025 | 10:33 PM

ठाण्यातील माजीवाडा नळपाडा येथील एसआरए प्रकल्पाचा वाद सुरु आहे. नागरिकांनी या प्रकल्पातील विकासकाला विरोध केला आहे. त्यामुळे या नागरिकांची बाजू घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज एसआरएच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. या प्रकल्पातील अनेक नागरिक येथे राहात नाहीत.त्यांनी जागा भाड्याने दिलेली आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या बायोमॅट्रीक सर्व्हेला नागरिकांचा विरोध आहे.स्थानिक नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे अन्यथा बायोमेट्रिक सर्वे होऊन देणार नाही असा थेट इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

ठाण्यातील पुनर्विकास रखडवणाऱ्या विकासकाची एसआरए प्रकल्पासाठी निवड केल्याने ५० वर्षांपासून येथे राहाणारे नागरिक संतप्त झाले आहे.प्रशासनाने लादलेला विकासक आम्हाला नको असा इशारा नागरिकांनी देत बायोमेट्रीक सर्व्हे थांबवण्याची मागणी केली आहे.रहिवाशांच्या या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एसआरए अधिकारी संदीप माळवी यांची आज भेट घेतली. त्यावेळी गेल्या काही दिवसापासून नळपाडा येथील झोपडपट्टी परिसरात बायोमेट्रिक सर्व्हे केला जात आहे. हा सर्व्हे न घेता आधी स्थानिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे यासाठी एसआरए कार्यालयात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी एसआरए अधिकारी संदीप माळवी यांनी नागरिकांना दम देत कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे धमकावले. यावेळी जितेंद्र आव्हाड देखील संतापले आणि त्यांनी अधिकारी संदीप माळी यांना खडे बोल सुनावले.स्थानिकांच्या बाजूने उभे राहत आव्हाड यांनी बायोमेट्रिक सर्व्हे होऊन देणार नाही असा थेट इशारा दिला.

आंदोलनाचा इशारा

एसआरएने थोपवलेला विकासक नको असून आमचा विकास आम्हीच करू अशा इशारा माजीवाडा नळपाडा येथील झोपडपट्टीवासियांनी दिला आहे. एसआरए प्रकल्पाबाबत अधिकारी संदीप माळवी हे त्यांच्या भूमिकेवरती ठाम असल्याने आणि नागरिकांचा या बायोमेट्रीक सर्व्हेक्षणाला विरोध असल्याने आता नागरिकांच्या तीव्र रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही दिवसापासून ठाणे एसआरए कार्यालयात भोंगळ कारभार होत असल्याचा आरोप केळकर,केदार दीघे आणि जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी स्थानिकांच्या बाजूने उभे राहात आंदोलनाचा इशारा दिल्याने आता पुढे काय होते याकडे लक्ष लागले आहे.