अनेक नेत्यांच्या प्रयत्नांना यश नाही, आता देवेंद्र फडणवीस मैदानात; बंद दरवाजाआड मनधरणी सुरू, अनिल सोले बंडखोरी मागे घेणार?
Nagpur Graduate Constituency Election: नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपची कोंडी झाल्याचे समोर आले आहे. अनिल सोले यांच्या मनधरणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट घरी पोहोचले आहेत.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपसमोर बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे. भाजपचे नेते अनिल सोले यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने पक्षाची चिंता वाढली आहे. अनेक नेत्यांनी मनधरणी करूनही सोले यांनी माघार घेतलेली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनिल सोले यांच्यात बंद दाराआड चर्चा होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनिल सोले यांच्या घरी पोहोचल्यानंतर घराचा दरवाजा बंद करण्यात आला आहे. आत दोन्ही नेत्यांमध्ये मनधरणीची बैठक सुरू आहे. भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अनिल सोले आता तरी आपली भूमिका बदलून भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल सोले यांच्या नाराजीवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. अनिल सोले हे पक्षाचे निष्ठावान नेते आहेत. भाजप हा एक परिवार आहे. या कुटुंबातील सदस्य नाराज राहू नये, याची पक्ष काळजी घेत आहे आणि यापुढेही घेईल, असे त्यांनी सांगितले. संवादातून समाधान काढण्याची परंपरा भाजपमध्ये जुनी असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. चर्चेतून सोले यांचे मत बदलू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पदवीधर निवडणुकीच्या तयारीबाबत बोलताना मुनगंटीवार यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय विजयाचे नियोजन आणि पुढील निवडणुकांची रणनीती बैठकीत आखल्याचे सांगितले. नागपूरची जागा भाजपची परंपरागत जागा असल्याचा दावा करत, पूर्वी भाजप स्वतंत्रपणे लढतानाही मोठ्या मताधिक्याने जिंकत होता, असे ते म्हणाले. आता महायुतीची साथ असल्याने या निवडणुकीतही मोठ्या मताधिक्याने विजय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मात्र अनिल सोले यांची बंडखोरी कायम राहिल्यास भाजपच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोले नेमकी काय भूमिका घेतात आणि सुधाकर कोहळे यांना पाठिंबा देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.