
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाची आजची सुरुवात अत्यंत भावूक वातावरणात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या राजकीय प्रवासातील अनेक पैलू उलगडत त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पारदर्शकतेबद्दल भाष्य केले. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीसांनी २०१९ मधील बहुचर्चित शपथविधीवरही त्यांनी मोठे भाष्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या शोक प्रस्तावावेळी २०१९ मध्ये झालेल्या शपथविधीच्या आठवणी जागवल्या. यावेळी ते म्हणाले, २०१९ मध्ये जेव्हा आम्ही एकत्र सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा काही काळानंतर वरिष्ठांनी तो निर्णय बदलला. मात्र, दादा आपल्या शब्दावर ठाम राहिले. ‘मी शब्द दिला आहे आणि मी तो मोडणार नाही’ अशी भूमिका त्यांनी घेतली होती. अजित पवार हे खऱ्या अर्थाने शब्दाला जागणारे नेते होते, याचा अनुभव आम्ही त्यावेळी घेतला.
यावेळी २०१९ च्या शपथविधीवरून होणाऱ्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल टिप्पणी केली. दादांना पहाटेचा शपथविधी हे शब्द अजिबात आवडायचे नाहीत. दादा म्हणायचे की पहाट म्हणजे पहाटे ६ वाजेची वेळ असते. आमचा शपथविधी तर सकाळी ९ वाजता झाला होता. मग त्याला पहाटेचा का म्हणता? तो सकाळचा शपथविधी आहे. मला आजही आठवतंय की त्यांना काही ना काही प्रमाणात याची किंमत मोजावी लागली. पण तरीही त्यांनी सांगितलं की एकदा निर्णय झाला आहे. मग त्यांच्या निर्णयाला मी बांधील असेल, अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जेव्हा आमच्या विरोधात गेला, तेव्हा वर्षा बंगल्यावर मी आणि दादा आम्ही दोघेच होतो. त्यावेळी तो निर्णय विरोधात गेल्यावर सरकार स्थापन करणं शक्य नव्हते. दादांनी विचारलं की काय करायचं? त्यावर मी म्हणालो की यात तुम्ही स्वत:चा बळी द्यावा, अशी आमची अपेक्षा नाही. जे काही असेल तुम्ही तुमचा निर्णय घ्या. त्यानंतर वर्षा बंगल्यावर माझ्याशी चर्चा करुन दादांनी मग त्यांचा निर्णय घेतला. कारण त्यांच्यासोबत जे आमदार होते, शेवटी त्यांचेही भविष्य आपल्याला पाहायचे आहे. त्यानंतर मग दादांनी पुन्हा जे सरकार झाले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या स्वभावात पारदर्शकता आहे. ते जे आहे ते तोंडावर बोलून टाकायचे. त्यावेळी ते राजकीय परिणामांची चिंता करायचे नाही,” असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.