500 कोटींच्या ऑडिओ क्लीप बॉम्ब प्रकरणी तडकाफडकी मोठा आदेश, मुख्यमंत्र्यांनी उचललं सर्वात मोठं पाऊल!
मनोज जरांगे यांनी जारी केलेल्या ऑडिओ क्लीप प्रकरणी तसेच 500 कोटींच्या आरोपांप्रकरणी मोठा निर्णय घेण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांनी मोठा आदेश दिलाय.

Manoj Jarange Patil Audio Clip : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांनी बाहेर काढलेल्या काही ऑडिओ क्लीपची चांगलीच चर्चा आहे. या ऑडिओ क्लीपमुळे राज्यातील राजकारणही ढवळून निघाले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. जरांगेनी बाहेर काढलेल्या ऑडिओ क्लीपमध्ये भाजपा नेत्यांचा आवाज आहे, असा दावा शिंदे गटाच्या काही नेत्यांनी केलाय. तर भाजपाने मात्र या ऑडिओ क्लीपचा आमच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिलेय. दरम्यान, आता याच ऑडिओ क्लीपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठा आदेश जारी केलाय. या आदेशानंतर आता या प्रकरणातील सत्य समोर येण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांनी नेमका काय आदेश दिला?
मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या काही ऑडिओ क्लीपमध्ये त्यांना 500 कोटी रुपये दिल्याचा उल्लेख आहे. याच क्लीपमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचाही उल्लेख आलेला आढळतोय. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई पोलिस आयुक्तांना आदेश दिलाय. त्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी गठीत करण्याचा आदेश दिलाय. आता पोलिसांचे एक विशेष पथक स्थापन केले जाणार असून जरांगेनी आणलेल्या कथित ऑडिओ क्लीपची चौकशी केली जाईल. तसेच या ऑडिओ क्लीपमधील आवाज नेमका कोणाचा आहे? हे तपासण्यात येईल. तपासानंतर संबंधित आरोपांमध्ये किती तथ्य आहे हेही समजणार आहे.
भाजपा-शिवसेना आमनेसामने
जरांगेंच्या ऑडिओ क्लीमुळे महायुतीमधील शिवसेना आणि भाजपा पक्ष एकमेकांच्या समोरासमोर आले आहेत. शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के, उदय सामंत यांनी थेट भाजपावर टीका केली. तर आमचा यात संबंध नाही, संबंधित ऑडिओ क्लीप ही एआयच्या मदतीने तयार केलेली असू शकते. यातील सत्यता तपासायला हवी, अशी भूमिका भाजपाने घेतलीय. तसेच दोन्ही पक्षाने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. शिंदे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदनही दिले होते. आता या प्रकरणात नेमके काय काय समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.