Ahaan Panday New Film : ‘सैयारा’नंतर अहान पांडे पुन्हा चर्चेत! शर्वरीसोबत ‘बेपरवाह’मध्ये करणार रोमान्स, पहिलं पोस्टर समोर
अहान पांडे आणि शर्वरी वाघ यांच्या 'बेपरवाह' चित्रपटाचे पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर झाली आहे. यश राज फिल्म्सच्या या रोमँटिक अॅक्शन-ड्रामाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहेत. पोस्टरमधून दमदार अॅक्शन आणि प्रेमाचा संगम दिसत आहे. २६ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, ही नवी जोडी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

बॉलिवूडमध्ये अनेक नव्या चित्रपटांची चर्चा सुरू असतानाच अभिनेता अहान पांडे आणि अभिनेत्री शर्वरी यांच्या आगामी ‘बेपरवाह’ या चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेता अहान पांडेने मोहित सूरीच्या फिल्म ‘सैयारा’मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या फिल्मला प्रेक्षकांचा इतका मोठा प्रतिसाद मिळाला की तो ब्लॉकबस्टर ठरला. तेव्हापासूनच चाहते अहानला पुन्हा स्क्रीनवर पाहण्यासाठी उत्सुक आहे. आता आहान लौकरच यश राजच्या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात ते शर्वरी वाघसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
या चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर आलं असून, त्यातून रोमॅन्स आणि अॅक्शनचा जबरदस्त संगम पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, पोस्टरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. ‘बेपरवाह’ हा रोमँटिक अॅक्शन-ड्रामा असून, त्याचं दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहेत. तर आदित्य चोप्रा या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. त्यामुळे या नव्या प्रोजेक्टबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
अहान पांडे आणि शर्वरी पहिल्यांदाच एकत्र झळकणार
चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये अहान पांडेच्या हातात बंदूक दिसत आहे, तर शर्वरीच्या हातात गिटार आहे. मात्र, पोस्टरमध्ये दोघांचेही चेहरे दाखवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे चित्रपटातील त्यांच्या लूकबद्दल निर्मात्यांनी सध्या गुपित कायम ठेवलं आहे. पोस्टरसोबत ऐकू येणाऱ्या संवादामुळेही चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. अहानच्या आवाजातील संवादात प्रेमाची बेधडक भावना आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी व्यक्त केली आहे. अहान पांडे आणि शर्वरी पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. त्यामुळे या नव्या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
View this post on Instagram
अनित पड्डानेही दिली प्रतिक्रिया
‘बेपरवाह’च्या पोस्टरवर अहान पांडेची सहकलाकार आणि ‘सैयारा’ चित्रपटातील अभिनेत्री अनित पड्डा हिनेही प्रतिक्रिया दिली आहे. तिने कमेंटमध्ये ‘बेस्ट ऑफ बेस्ट! खूप जास्त उत्साहित आहे!’ अशा शब्दांत आपला आनंद व्यक्त केला. अहान पांडेने यापूर्वी यशराज फिल्म्सच्या ‘सैयारा’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केलं होतं. आता ‘बेपरवाह’च्या माध्यमातून अहान पुन्हा एकदा यशराज फिल्म्सच्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.
कधी प्रदर्शित होणार ‘बेपरवाह’?
चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करतानाच निर्मात्यांनी त्याच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. ‘बेपरवाह’ हा चित्रपट 26 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक अली अब्बास जफर पुन्हा एकदा यशराज फिल्म्ससोबत काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी या बॅनरअंतर्गत ‘सुलतान’ आणि ‘टायगर जिंदा है’ यांसारख्या चित्रपटांसाठी काम केलं आहे. दरम्यान, ‘बेपरवाह’च्या कथानकाबद्दल आणि इतर कलाकारांबद्दल अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही.
