आधी पत्नीच्या बहिणीला शिक्षणासाठी घरी आणलं, नंतर प्रेम जडलं अन्…; लग्नाच्या वादातून जावयासोबत धक्कादायक कृत्य घडलं
Solapur Crime News: धाकट्या मेव्हणीशी लग्न केल्याचा वाद टोकाला पोहोचल्याचे समोर आले आहे. यातून मंगळवेढ्यात जावयाची हत्या करण्यात आली आहे. सोलापुरात ही घटना घडली आहे.

सोलापूर जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली आहे. मंगळवेढा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या धाकट्या बहिणीशी विवाह केल्याच्या वादातून जावयाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. किसन गडहिरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास मंगळवेढा पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, किसन गडहिरे यांनी विवाहानंतर पत्नीच्या धाकट्या बहिणीला उच्च शिक्षणासाठी आपल्या घरी आणले होते. याच काळात किसन आणि त्यांच्या मेव्हणीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. पुढे दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या विवाहाला किसन यांची पहिली पत्नी, सासरे अतुल कसबे आणि अन्य नातेवाइकांचा विरोध होता. या विवाहावरून कुटुंबात वाद निर्माण झाला होता. .
हा वाद पुढे अधिकच चिघळल्याची माहिती समोर आली आहे. किसन गडहिरे यांनी सासरे अतुल कसबे आणि मेव्हण्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. याचदरम्यान, मेव्हण्याचा पाठलाग सुरू असताना परिस्थितीने गंभीर वळण घेतले. अतुल कसबे यांनी किसन गडहिरे यांच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर तलवारीने वार करून त्यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात किसन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेने मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली आहे. विवाहाच्या निर्णयावरून सुरू झालेला वाद हिंसक वळणावर पोहोचल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे. या प्रकरणात नेमकी घटना कशी घडली, हल्ल्यामागील परिस्थिती काय होती आणि संबंधित व्यक्तींची भूमिका काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत. मंगळवेढा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
