एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यावर ते पैदा झाले… मिसिंग लिंकवरून मुख्यमंत्र्यांचा घणाघाती हल्लाबोल

Devendra Fadnavis : दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात मिसिंग लिंकवर दरड कोसळली होती. यावरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यावर ते पैदा झाले... मिसिंग लिंकवरून मुख्यमंत्र्यांचा घणाघाती हल्लाबोल
CM Fadnavis on Missing Link Criticism
Image Credit source: X
| Updated on: Jul 08, 2026 | 2:38 PM

काही महिन्यांपूर्वी मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे उद्घाटन झाले आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहने जातात. या मार्गामुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील वाहतूक आणखी सुकर झाली आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात मिसिंग लिंकवर दरड कोसळली होती. यामुळे जवळपास 18 तास या मार्गावरील वाहतूक बंद होती. यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. या टीकेला आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत प्रत्युत्तर देताना विरोधकांवर सडकून टीका केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एकाद कोटी खोटारडे लोक मेल्यावर हे पैदा झाले…

मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. यावर बोलताना फडणवीसांनी म्हटले की, कनेक्टिंग लिंकचा विषय मोठ्या प्रमाणात गाजला. मला आश्चर्य वाटतं, काही लोक तर असे आहेत की एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले असतील. त्यांना खोटं बोलायला लाजही वाटत नाही. कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यावरही दुसऱ्या दिवशी टिव्हीवर येऊ खोटे बोलतात. खोटारडेपणा बाहेर आला. पण त्याचवेळी महायुती सरकारची हिंमत होती म्हणून कनेक्टिंग लिंक बांधून दाखवली.

आघाडी सरकारने मिसिंग लिंकची फाईल बंद केली होती…

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘कोकण रेल्वेच्यावेळीही ही लोकल सुरू होऊ शकत नाही. विरोध झाला. दरड कोसळण्याचं कारण दिलं. पण मधु दंडवते या एका व्यक्तीमध्ये हिंमत होती. त्यांनी बांधली. बांधल्यानंतर 15 वर्ष दरवर्षी दरड कोसळायची. प्रत्येक वर्षी शिकायचो. काही ना काही काम करायचो. त्या भीतीने कोकण रेल्वे तयार केली नसती तर काय अवस्था राहिली असती. या मिसिंग लिंकचा इतिहासही असाच आहे. मागच्यावेळी आघाडीच्या सरकारमध्ये मिसिंग लिंकचा प्रस्ताव तयार झाला. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी दोन पानी नोट लिहून 14 कारणं देऊन मिसिंग लिंक तयार करता येणार नाही सांगितलं. फाईल बंद केली. पण लक्षात ठेवा, गिरते हे शेर ए सवारही मैदान ए जंग में, वो तिफ्ल क्या चले जो घुटनो के बल चले.’

भारतातील सर्वात उंच ब्रीज तयार केला…

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘आम्ही अधिकारी आणि एक्सपर्टशी बोललो. ते म्हणाले. शक्य आहे. आपण करून दाखवलं. इंजिनियरिंग मार्बल तयार झालं. जगातील सर्वात मोठा बोगदा. भारतातील सर्वात उंच ब्रीज तयार करून दाखवला. ज्यांनी इंजिनीअरिंग मार्बल करून दाखवलं, त्यांचं अभिनंदन करतो. अपघात थांबले. वाहतूक कोंडी थांबली. काय घडलं तर वरून दरड कोसळली. पाण्याच्या कमानीवर पडली. ती तुटली. खाली दरड पडली आणि ढिगारा तयार झाला. बोगद्यात एमर्जन्सीचं बटन दाबल्यावर तीन मिनिटात क्रेन आली. बोगदा होता म्हणून आम्ही वाचलो असं काही लोकांनी सांगितलं.’

महाराष्ट्राला बदनाम करू नका…

CM फडणवीस यांनी म्हटलं की, ‘काही लोकांना तोंडखुरी आहे. आमचा विदर्भातील शब्द आहे. असे सुरू झाले की 7 हजार कोटी पाण्यात गेले. जयंतराव 18 तासात ट्रॅफिक सुरू झालं. यांच्या थोबाडावर टिच्चून. फडणवीसला शिव्या द्या. मला सवय आहे. शिव्या प्रुफ आहे मी. आजपासून 10 वर्षाने शिव्या देणारे दिसणार नाही. फडणवीस आणि शिंदेचं नाव असेल. मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. ही विनंती आहे.’

Follow Us