
जालना | 1 सप्टेंबर 2023 : जालन्यात आंतरवली सराटे गावात आज मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्जचे व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओंमध्ये पोलिसांनी किती भीषण लाठीचार्ज केलाय ते स्पष्ट दिसत आहे. गावकऱ्यांनी दगडफेक केला. त्यामुळे लाठीमार आणि अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पण या घटनेमुळे मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले. मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर मार्गावर काही वाहनांची जाळपोळ केली. तसेच दगडफेक करण्यात आली. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिलीय.
“मी स्वत: उपोषणकर्त्याबरोबर बोललो होतो. मी अधिकाऱ्यांनाही बोललो होतो. पोलीस एस पी आणि कलेक्टरशी माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. त्यांनी सांगितलं की, जरांगे पाटील यांना रुग्णालयात नेणं जरुरीचं होतं. त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न सुरु होता. पण त्यावेळी दगडफेकीची दुर्देवी घटना घडली”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
“मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकारची स्पष्ट भूमिका आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी न्यायालयीन लढाई सुरु आहे. उपसमितीची वारंवार बैठक घेत आहेत. यामधून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि कोर्टातही टिकायला पाहिजे यासाठी सरकार प्राध्यान्याने काम करत आहे. पण असं असताना दुर्देवी प्रकार समोर आला आहे. सरकार याची सखोल चौकशी करेल. यातून खरं वास्तव्य समोर येईल. दोषी ठरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल”, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं.
“शांततेत आंदोलकांवर लाठीचार्ज करता कामा नये, अशी सरकारची भूमिका आहे. यावर सरकार योग्य ती उच्च स्तरीय चौकशी करेल. मराठा समजाला मी शांततेचं आवाहन करतो. शांतता प्रस्थापित करणं हे पहिलं काम केलं पाहिजे. लाठीचार्जवर चौकशी केली जाईल आणि दोषी आढळले तर कारवाई केली जाईल. मराठा आरक्षण हा उद्देश सर्वांचा आहे. अशाप्रकारच्या घडू नयेत यासाठी मराठा समन्वयकांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. सरकार पूर्णपणे त्यांच्या बाजूने आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, संबंधित घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या मनात एखाद्या घटकाविषयी असलेली भावना पोलिसांच्या कृतीतून दिसली असावी, गृहमंत्र्यांनी पोलिसांना तशी सूचना केली असावी, अशी टीका शरद पवारांनी दिली. त्यांनी या घटनेवर निषेध व्यक्त केला. याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी “राज्य सरकारची जबाबदारी आहे. पण शरद पवार हे मोठे नेते आहेत. अशा घटनेवेळी शांतता प्रस्थापित करणारं आवाहन केलं पाहिजे. आणखी उद्रेक होईल, अशाप्रकारची भूमिका कुठल्याही नेत्याने घेऊ नये”, असं आवाहन केलं.