
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आणखी तीन दिवसांनी म्हणजे 15 तारखेला मतदान होऊन 16 ताखेला राज्याच्या 29 महापालिकांचा निकाल लागेल. त्यासारठी सर्वच पक्षांची जय्यत तयारी सुरू असून शहरोसहरी प्रचार सुरू असून मोठमोठ्या नेत्यांच्या सभाही गाजत आहेत. मात्र अद्याप निवडणूक झालेली नसतानाच राज्यातील अनेक ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. राज्यात एकूण 66 उमेदवार हे निवडणूक न लढवताच बिनविरोध निवडून आले असून त्यामध्ये महायुतीचे ,भाजप आणि शिंदे गटाचे सर्वाधिक उमेदवार आहेत. मात्र यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असून विरोधकांनी सत्ताधारी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. दमदाट्या करून, पैसे देऊन उमेदवार निवडून आणल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी टीव्ही9 मराठीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. टीव्ही9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना बिनविरोध उमेदवारांवरून सवाल विचारला. तुमचे (भाजप) आणि शिंदे गटाचेच उमेदवार निवडणूक न लढवताही, बिनविरोध निवडून आले. दमदाटी करून, पैसे देऊन उमेदवार निवडून आणल्याचा आरोप विरोधक करत आहेत, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर देत उमेदवारांच्या निवडीबद्दल सांगितलं. तसंच त्यांनी याच मुद्यावरून विरोधकांनाही घेरलं.
जर उमेदवार देणार नसतील तर आम्ही स्वत आणून उभे करायचे ?
या निवडणुकीमध्ये फक्त आमचे उमेदवार निवडून हे म्हणणं चुकीचं आहे. अपक्ष आणि इस्लामिक पार्टीचाही उमेदवार निवडून आलाय ना. अपक्षांची काय ताकद असते ?. पण तोही आला ना ?. किरीट सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्यांच्या विरुद्ध काँग्रेसने उमेदवार नाही दिला, उबाठाने नाही दिला. शरद पवारांनी उमेदवार दिला नाही. अपक्ष उमेदवार त्यांच्या पुढे आहे. अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार नाही सापडले. याचं उदाहरण कल्याण डोंबिवली आहे. कल्याण डोंबिवलीत आमचे मागच्यावेळी १०५ निवडून आले. आमची शक्ती वाढली असं मुख्यमंत्री म्हणाले.
उद्धव ठकरेंची शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे आली, आता त्यांच्याकडे नेतेच राहिले नाही. आम्ही आघाडी केल्यावर महापालिका वनसाईड झाली. दुसऱ्या पक्षांचं अस्तित्व संपलं. अनेक वॉर्डात यांना उमेदवारच मिळाले नाही. जर उमेदवार देणार नसतील तर आम्ही स्वत आणून उभे करायचे का ? असा रोखठोक सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला.
दीड दोन वर्षात कोणत्या भागात यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं ?
याआधी भारताच्या लोकसभेत 35 खासदार बिनविरोध निवडून गेले. त्यातील 32 उमेदवार हे काँग्रेसच्या काळात गेले. पहिल्या तीन निवडणुकीचं सोडून द्या, पण आत्ताचंही उदाहरण आहे. मागच्या निवडणुकीत असे उमेदवार निवडून गेले. जर लोकसभेत बिनविरोध जाऊ शकतात, तर महापालिकेत का जाऊ शकत नाही ? असा थेट सवालही मुख्यमंत्र्यांनी विचारला. हे लोकं मुंबई नाशिकच्या बाहेर कुठे प्रचाराला गेले सांगा. दीड दोन वर्षात कोणत्या भागात जाऊन यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं ? आपण हरलो तर ब्रँड राहणार नाही. म्हणून घराबाहेर पडलेच नाही अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर, ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.