हिंदीची सक्ती म्हणजे महाराष्ट्रातील मराठीपण घालवण्याचा कट; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

राज्यात हिंदी सक्ती करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून चांगलंच राजकीय वातावरण तापलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलनाची हाक दिल्यानंतर लगेचच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही हिंदी सक्तीच्या विरोधात मैदानात उतरणार असल्याचं जाहीर केलं आहे. हिंदी सक्तीचं करणं हा सरकारचा कट आहे, असं गंभीर आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे.

हिंदीची सक्ती म्हणजे महाराष्ट्रातील मराठीपण घालवण्याचा कट; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
raj thackeray
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 26, 2025 | 2:05 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. या निर्णायाचा विरोध म्हणून येत्या 6 जुलै रोजी मुंबईत महामोर्चा काढण्याची हाकही राज ठाकरे यांनी दिली आहे. तसेच पक्षभेद विसरून मराठी म्हणून सर्वांनीच या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. तसेच सरकारचं हे त्रिभाषा सूत्र म्हणजे महाराष्ट्राचं मराठीपण घालवण्याचा मोठा कट असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज यांना त्रिभाषा सूत्राची माहिती दिली. पण राज ठाकरे यांनी सरकारच्या सर्व सूचना आणि घोषणा फेटाळून लावल्या आहेत. हिंदीला आमचा विरोध नाही. पण हिंदीची सक्ती आम्ही चालू देणार नाही, असं राज ठाकरे यांनी दादा भुसे यांनी निक्षून सांगितल्याने दादा भुसे यांना खाली हात परतावे लागले. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

वाचा: मराठी कलाकार, खेळाडूंनो हिंदीच्या विरोधात आंदोलनात उतरा; उद्धव ठाकरे यांचं आवाहन

हा कटच

हा जो कट आहे, याला कटच म्हणेल. महाराष्ट्रातील मराठीपण घालवण्यासाठी हा कट आहे. तो उद्ध्वस्त करण्यासाठी तमाम मराठी बांधवांनी भगिनींनी सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावं ही विनंती आहे. मोर्चात कोणताही पक्षीय झेंडा नसेल, मराठी हा अजेंडा असेल. या अजेंड्यासाठी मराठी माणसांनी सहभागी व्हावं, असं आवाहन राज यांनी केलं आहे.

तोडगा नाही

दरम्यान, दादा भुसे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शालेय शिक्षणामध्ये तिसऱ्या भारतीय भाषेच्या समावेशाबाबत राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. माझ्याबरोबर शिक्षण विभागातील अधिकारीही होते. तिसऱ्या भाषेचा समावेश आवश्यक का आहे? हे आम्ही राज ठाकरेंसमोर ठेवले. त्यांना आमची भूमिका मान्य नाही असं दिसतं आहे. आजची चर्चा झाली ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहेचवणार आहे. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही, असं दादा भुसे यांनी सांगितलं.

राज यांची सूचना…

यावेळी राज ठाकरे यांनी काही सूचना केल्या आहेत. राज यांची हिंदीबाबतची नकारात्मक भूमिका आहे. कला आणि क्रीडा विषयांचा अभ्यासक्रमातील गुणांकनासाठी समावेश असावा अशी सूचना राज ठाकरेंनी केली आहे, असंही भुसे यांनी सांगितलं.