नितेश राणेंना तीन अटींवर जामीन मंजूर

उपअभियंत्यावर चिखलफेक करणाऱ्या आमदार नितेश राणे यांना सशर्त जामीन मंजूर झाला आहे. ओरोस जिल्हा न्यायालयाने नितेश राणे आणि त्यांच्या 18 कार्यकर्त्यांना सशर्त जामीन मंजूर केला.

नितेश राणेंना तीन अटींवर जामीन मंजूर

सिंधुदुर्ग : उपअभियंत्यावर चिखलफेक करणाऱ्या आमदार नितेश राणे यांना अखेर सशर्त जामीन मंजूर झाला आहे. ओरोस जिल्हा न्यायालयाने नितेश राणे आणि त्यांच्या 18 कार्यकर्त्यांना सशर्त जामीन दिला. कणकवली दिवाणी न्यायालयाने नितेश राणेंसह सर्व आरोपींना 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र त्यावरिोधात नितेश राणेंनी ओरोस जिल्हा न्यायालयात धाव घेत, जामीनासाठी अर्ज केला होता. ओरोस न्यायालयाने सर्व आरोपींना वैयक्तिक 20 हजार रुपयांच्या हमीवर जामीन दिला. वकील संग्राम नाईक यांनी नितेश राणे यांची बाजू मांडली.

सशर्त जामीनाच्या अटी काय?

1) अशा पद्धतीचा गुन्हा पुन्हा करणार नाही

2) प्रत्येक रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी

3) तपास कार्यात सहकार्य करावे

प्रकरण काय?

नितेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गेल्या बुधवारी (3 जुलै) उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना धक्काबुक्की करुन त्यांच्या अंगावर चिखलाने भरलेल्या बादल्या ओतल्या होत्या. याप्रकरणी  उपअभियंते प्रकाश शेडेकर यांनी नितेश राणे यांच्याविरोधात कुडाळ पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर नितेश राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी नितेश राणेंच्या घराबाहेर फौजफाट्यासह हजेरी लावली. त्यावेळी दंगल नियंत्रण पथकही उपस्थित होतं. या प्रकरणी दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 जुलैला नितेश राणे स्वत:हून कणकवली पोलिसात हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

यापूर्वी न्यायालयात काय झालं?

त्यानंतर शुक्रवारी (5 जुलै) नितेश राणे यांच्यासह 18 समर्थकांना कणकवली येथील दिवाणी न्यायालयात हजर केलं होतं. त्यावेळी  कोर्टाने त्यांना 9 जुलैपर्यंत कोठडी सुनावली होती. यानंतर काल (9 जुलै) आमदार नितेश राणे यांच्यासह 18 समर्थकांना दुपारी कणकवली येथील दिवाणी न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडीऐवजी 23 जुलैपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली होती.

या निर्णयानंतर नितेश राणे यांनी जामीनासाठी ओरोस जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. याच अर्जावरील सुनावणीदरम्यान आज न्यायालयाने नितेश राणेंसह त्यांच्या 18 समर्थकांना सशर्त जामीन मंजूर केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *