काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळावं, माणिकराव ठाकरेंची पहिल्यांदाच उघड मागणी

पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर पहिल्यादांच काँग्रेसच्या एखाद्या बड्या नेत्यानं उपमुख्यमंत्रीपदाची मागणी उघडपणे केली आहे.

काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळावं, माणिकराव ठाकरेंची पहिल्यांदाच उघड मागणी
manikrao thakre
| Updated on: Feb 05, 2021 | 3:28 PM

यवतमाळ : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सत्ताधारी महाविकास आघाडीत मोठा फेरबदल होण्याचे संकेत आहेत. अशावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसला उपमुख्यमंत्री आणि सभापती पद द्यावं अशी मागणी केली आहे. पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर पहिल्यादांच काँग्रेसच्या एखाद्या बड्या नेत्यानं उपमुख्यमंत्रीपदाची मागणी उघडपणे केली आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पटोले यांच्या गळ्यात लवकरच प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडेल असं निश्चित मानलं जात असलं तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिळून प्रदेशाध्यक्षपदाबाबत निर्णय घेतील असंही माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय.(Manikrao Thackeray’s demand to give Congress the post of Deputy CM)

नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभा अध्यक्ष कोण होणार? पुढचा विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच असणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यावर बोलताना महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांचे नेते याबाबत बैठक घेऊन योग्य निर्णय घेतील, असं पटोले यांनी सांगितलं आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मराठवाड्यातील काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर, मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज असलेले आमदार संग्राम थोपटे आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या नावांची चर्चा आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची काँग्रेसची इच्छा

दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेच्या वाट्याला देऊन काँग्रेस उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठी आग्रही असल्याचंही बोललं जात होतं. अशावेळी आता माणिकराव ठाकरे यांच्यासारख्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यानेच ही मागणी केल्यामुळे, काँग्रेसची उपमुख्यमंत्रीपदाची इच्छा आता लपून राहिलेली नाही. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचं विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी एक वर्षापूर्वी अस्तित्वात आली. तेव्हा सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घेतलेले आहेत, ते संपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही करतो, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी अमित देशमुखांचंही नाव

विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले किंवा कुठल्याच काँग्रेस नेत्यानं पटोलेच प्रदेशाध्यक्ष असतील, असं म्हटलेलं नाही. दिल्लीतूनही अजून पटोलेंच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदी घोषणा झालेली नाही. त्याला ज्याप्रमाणं उशीर होतोय ते पहाता पटोलेंना मंत्रिमंडळात घेऊन अमित देशमुख यांना प्रदेशाध्यक्ष केलं जाण्याची चर्चा आहे. पटोले हे आक्रमक नेते आहेत आणि त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं तर तिघांच्या सरकारमध्ये अडचण होईल, अशी शक्यता वर्तवली जातेय. त्याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी पुढं येत आहे.

संबंधित बातम्या :

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज?

शरद पवार म्हणाले, काँग्रेसच्या अंतर्गत वादातून राजीनामा, नाना पटोले म्हणतात….

Nana Patole | भाजपात असताना मोदींशी लढले आता थेट काँग्रेसच्या राज्यातल्या सर्वोच्चपदी, कोण आहेत लढवय्ये नाना?

Manikrao Thackeray’s demand to give Congress the post of Deputy CM