पुणे प्रकरण : पीडित तरुणी ओरडली का नाही? गृहराज्यमंत्र्यांचा अजब सवाल

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार करण्यात आला, या प्रकरणावर बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

पुणे प्रकरण : पीडित तरुणी ओरडली का नाही? गृहराज्यमंत्र्यांचा अजब सवाल
| Updated on: Feb 27, 2025 | 8:09 PM

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातल्या स्वारगेट बसस्थानकामध्ये उभ्या असलेल्या एका बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला. ही घटना सोमवारी पाहटेच्या सुमारास घडली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली असून, वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान या घटनेवर बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. स्वारगेटमधील घटना शांततेत घडली, पीडित तरुणी ओरडली का नाही? असा सवाल यागेश कदम यांनी केला आहे, योगेश कदम यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले योगेश कदम? 

‘परवा स्वारगेट एसटी स्टँडवर जी घटना घडली त्यामध्ये कुठलाही स्ट्रगल किंवा फोर्सफुल कृती झाली नाही. ही घटना घडली त्यावेळी शिवशाही बसच्या आजुबाजूला 10 ते 15 लोक होते. पण तरुणीने विरोध न केल्याने कोणालाही शंका आली नाही. त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला. आता आरोपी ताब्यात आल्यावर आणखी काही गोष्टी स्पष्ट होतील’ असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे. योगेश कदम यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावरून विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत योगेश कदम यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

 

नेमकं काय म्हणाले वड्डेटीवार? 

‘पुणे- स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत महायुतीचे नाते काय ? आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलीवरच महायुतीतील मंत्र्याकडून आरोप का ? स्वारगेट बलात्कार प्रकरणात अजून आरोपी पकडला नाही, तरी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आरोपीला क्लिनचीट देत आहेत? स्वारगेट मध्ये बलात्कार झाला आणि या मंत्र्यांच्या मते त्या मुलीने विरोध केला नाही, म्हणजे या गुन्ह्याची जबाबदारी त्या पीडित मुलीवर ढकलत आहे. विधान करताना मंत्र्यांनी थोडी लाज शरम बाळगली पाहिजे!

आरोपीला शोधण्याऐवजी पीडित मुलीला दोष देऊन सिद्ध काय करायचं आहे? आरोपीला क्लिनचीट देण्यासाठी मंत्र्यांची इतकी घाई का आहे? राज्यातील महिलाना लाडक्या बहिण म्हणून मिरवणाऱ्या युती सरकारची नियत इतकी खालच्या स्तरावरची असताना महिलाना सुरक्षित कसे वाटेल? आरोपी हा सत्ताधारी आमदाराचा कार्यकर्ता असल्याचे माहिती होताच महायुती मंत्रिमंडळाकडून आता बलात्कारी आरोपीची बाजू घेऊन त्याला वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे का?’ असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.