लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवणार

लसीकरणामुळे नागरिकांना चांगला फायदा होत असून त्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात राहण्यासाठी मदत होत आहे. या अनुषंगाने लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने लसीकरणाचा वेग वाढवावा, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवणार
कोरोना लसीकरण


नाशिकः लसीकरणामुळे नागरिकांना चांगला फायदा होत असून त्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात राहण्यासाठी मदत होत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात विविध मार्गाने जनजागृतीच्या माध्यमातून व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने लसीकरणाचा वेग वाढवावा, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित कोरोना सद्यस्थिती आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. बैठकीस आमदार दिलीपराव बनकर, डॉ. राहुल आहेर, हिरामण खोसकर, नितीन पवार, प्रा देवयानी फरांदे, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर आदी उपस्थित होते.

कवच कुंडल मोहिमेला प्रतिसाद

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी दर 2.6 टक्के तर मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे. म्युकरमायकोसिस आजाराच्या 779 रुग्णांपैकी 12 रुग्ण उपचार घेत असून, 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच लसीकरणाच्या मिशन कवच कुंडल मोहिमेला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 45 लाख 68 हजार 256 नागरिकांचा पहिला व दुसरा डोस पूर्ण झाला आहे. लसीकरण वाढविण्यासाठी ‘मिशन कवच कुंडल’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मिशन कवच कुंडल मोहिमेला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आपला जिल्हा राज्यात तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र, यावरच समाधानी न होता, जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध आहे. त्याअनुषंगाने लवकरात लवकर शंभर टक्के लसीकरण कसे पूर्ण होईल यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करणे आवश्यक आहे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

ऑक्सिजन प्रकल्पासाठी प्रशिक्षण कार्यक्रम

जिल्ह्यात कोरोना काळात आवश्यक असणारी ऑक्सिजन क्षमता तयार करण्यात आली आहे. या ऑक्सिजन प्रकल्पांमार्फत सातत्याने ऑक्सिजन निर्मीती होणे आवश्यक असल्याने या प्रकल्पांची देखभाल दुरूस्ती देखील वेळेत होणे आवश्यक आहे. त्याकरिता जिल्हा कौशल्य विकास यंत्रणेमार्फत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत असून त्याद्वारे प्रशिक्षण दिलेले कर्मचारी जिल्ह्यातील ऑक्सिजन प्रकल्पांच्या देखभाल दुरूस्तीचे काम नियमितपणे पार पाडतील, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पालकमंत्री यांना बैठकीच्या वेळी सादर केली.

लसीकरण करताना लसीचा पहिला डोस सर्वांना मिळण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी साखर कारखाने सुरू होत आहेत, तेथील कामगारांना देखील लसीकरण करण्यात यावे. लसीकरण वेळेत होण्यासाठी खाजगी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात यावे.
– छगन भुजबळ, पालकमंत्री

इतर बातम्याः

ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाशिक महापालिकेत नोकर भरतीचा बार; आयटी हब, लॉजिस्टिक पार्कसाठी जोर

गब्बर कांदा व्यापाऱ्यांचे कारनामेः 100 कोटींचा ब्लॅकमनी जमीन खरेदीत, नाशिकमधले 26 जण रडारवर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI