
“निवडणूक आयोग हा त्यांचा गुलाम आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत EVM यंत्राचा वापर होईल. पण व्हीव्हीपॅट मशीन लावणार नाही. म्हणजे कोणाला मत दिलं हे तुम्हाला कळणार नाही. मग निवडणुका घेताय कशाला?” असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. “त्यांचं म्हणणं आहे की, निवडणूक मतमोजणीला, प्रक्रियेला उशीर होतो. उशीर होत असेल तर सरळ मतपत्रिकेवर निवडणुका घ्या. EVM कुठून आणणार तर मध्य प्रदेशातून. ज्या मध्य प्रदेशात सर्वात मोठा EVM घोटाळा झाला. त्या ईव्हीएम महाराष्ट्रात आणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं निवडणूक आयोगाने ठरवलं आहे” असा दावा संजय राऊत यांनी केला.
“अमित शहा आणि त्यांच्या पक्षाचे मार्गदर्शक नरेंद्र मोदी हे दिल्लीत बसल्यामुळे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खासकरुन शिंदेसेनेला त्यांच्या प्रमुखांना इथे येऊन बसावच लागेल. त्यात नवीन काय आहे, त्यांच्या पक्षाच मुख्यालय दिल्लीत आहे. म्हणून शिंदे जर आले असतील, तर तो उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याशी योगायोग समजू नये. त्यांना दिल्लीतच थांबावं लागतं. भाजपच्या इतर नेत्यांना हायकमांडना भेटण्यासाठी दिल्लीत थांबाव लागतं. रात्री-अपरात्री वाट बघावी लागते. गवतावर बसावं लागतं. विजार पांढरी असेल तर लॉन्च गवत लावून मुंबईला परतावं लागतं. हा इतिहास आहे दिल्लीचा” असं खासदार संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार अशी चर्चा
एका आठवड्यात एकनाथ शिंदे यांची दुसऱ्यांदा दिल्लीवारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार अशी चर्चा आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडण्याइतकी मोठी माणस सरकारमध्ये नाहीत. सरकारमध्ये बसलेली मोठी माणसं नाहीयत. ती धरुन बांधून निर्माण केलेले पदाधिकारी आहेत. महाराष्ट्राला महान माणस देण्याची सत्तेमध्ये परंपरा होती. ती भाजपमुळे खंडीत पावली. सगळे खुजे बुळे लोक सरकारमध्ये येऊन बसल्यामुळे महाराष्ट्राच्या महान परंपरेला ग्रहण लागलं आहे. राहुल गांधी वारंवार सांगतात कोई बडा खेला होनेवाला है, ते महाराष्ट्रात नाही, दिल्लीत होणार आहे” असा दावा संजय राऊत यांनी केला.