अजून दोघींवर गोळीबार करणार…आधी मैत्रिणीला गोळी घातली, आता पुन्हा पोलिसांसमोरच धमकी; काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अतिशय धक्कादायक अशी घटना घडली, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. चक्क सराईत गुन्हेगाराने आपल्या मैत्रिणीवर गोळीबार केलाय. या गोळीबारातून तरूणी ही थोडक्यात बचावली आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

अजून दोघींवर गोळीबार करणार...आधी मैत्रिणीला गोळी घातली, आता पुन्हा पोलिसांसमोरच धमकी; काय घडलं?
criminal
| Updated on: Aug 12, 2025 | 12:25 PM

छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना घडलीये. चक्क एका सराईत गुन्हेगाराने आपल्या मैत्रिणीवर गोळीबार केला. ही घटना रात्री बाराच्या दरम्यान घडली. या गोळीबारानंतर मुलगी थोडक्यात बचावली आणि तिच्या हाताला ही गोळी लागली. मात्र, या घटनेने शहरात खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. सध्या मुलीवर संभाजीनगरच्या घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या सराईत गुन्हेगारावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हेच नाही तर अल्पवयीन मैत्रिणीवर त्याने यापूर्वी बलात्कार केला होता आणि तिच्यावर चाकूने वार देखील. पोलिस घेऊन जात असताना त्याने कॅमेऱ्याकडे पाहून हातवारे केले आणि चक्क अजून दोन मुलींवर गोळीबार करणार असल्याचे म्हटले.

ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या किलेअर्क भागात रात्री 12 वाजता घडली. गोळीबारात मैत्रिणीच्या हाताला दुखापत झाली आहे. सय्यद फैजल ऊर्फ तेजा असं या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. बलात्कारासह त्याच्यावर पंधरा गुन्हे दाखल आहेत. गोळीबार झालेल्या मुलीचे नाव साक्षी मुरमरे आहे, गोळी हाताला लागल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी गोळीबाराच्या काही वेळातच आरोपीला ताब्यात घेतले. बलात्कार, खूनाचा प्रयत्न, चोरी अशी गंभीर गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. 2021 मध्ये त्याने आपल्या अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार केला, ज्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. संभाजीनगरच्या टीव्ही सेंटर चाैकात त्याने भरदिवसा एका रिक्षाचालकावर कोयत्याने वार केला होता, त्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. सय्यद फैजल हा सुरूवातीला छोट्या चोऱ्या करायचा. त्यानंतर तो काही सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात आला आणि त्याने गंभीर गुन्हे करण्यास सुरूवात केली.

यापूर्वी पोलिसांकडून त्याची धिंड देखील काढण्यात आली. धक्कादायक म्हणजे पोलिस त्याला घेऊन जात असताना तो कॅमेऱ्याकडे पाहून हातवारे करताना दिसला आणि आणखी दोन मुलींवर गोळी मारणार असल्याचे त्याने म्हटले. हैराण करणारे म्हणजे तो ज्यावेळी हे सर्वकाही बोलत होता, त्यावेळी चार पोलिस त्याच्या शेजारी होते. सय्यद फैजल हा जामिनावर बाहेर आला असता त्याने हा गोळीबार केलाय. पोलिसांकडून या प्रकरणी तपास केला जात आहे.