‘पाऊस नाही, पाणी नाही… घरात होतं ते दारात टाकलं’; दुष्काळाची व्यथा सांगताना छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला रडल्या
Chhatrapati Sambhajinagar Drought Crisis: शेतात पिकं नाहीत, घरात पैसे नाहीत, आम्ही करायचं तरी काय? दुष्काळाची व्यथा सांगताना शेतकरी महिलांच्या डोळ्यांत अश्रू आले आहेत.

महाराष्ट्रात पावसाच्या कमतरतेमुळे राज्य सरकारने ३५८ पैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाची पुनर्रचना, जमीन महसुलात सवलत आणि वीज बिलात सवलत यांसारख्या अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. दुष्काळामुळे महाराष्ट्रातील बळीराजा संकटात सापडला आहे. यानंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या शेतकरी महिलांनी निशब्द करणारे सवाल उपस्थित केले आहे. दुष्काळाच्या व्यथा मांडताना भगतवाडीतील महिलांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
दुष्काळाच्या व्यथा मांडताना छत्रपती संभाजीनगरच्या भगतवाडी येथील महिलांना अश्रू अनावर झाले आहेत. यावेळी बोलताना एक शेतकरी महिला म्हणाली की, पाऊस नाही, पाणी नाही घरात होतं ते दारात टाकलं. पिक वाळली आहेत. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली. मात्र दम धरला. जनावराला पण प्यायला पाणी नाही. कंपन्या काम देत नाहीत. त्याची काहीतरी सोय करा. चिंता करू चिंत्या रोग होण्याची वेळ आली आहे. रात्री झोप येत नाही. मुलं शाळेत जातात शाळेत पैसे मागतात, गाडीवाले पैसे मागतात. आमचं सगळं जीवन शेतीवर आहे, असं सांगताना महिलेला अश्रू अनावर झाले आहेत.
ती पुढे म्हणाली की, जेवढे पैसे होते तेवढे शेतीत घातले आहेत. आता तुम्ही सांगा काय करायचं. आम्ही खावावं की लग्न करावं की पोरांना पोसावं की शिक्षण करावं तुम्ही सांगा? आम्हाला रडायची वेळ आली जनावर कसे पोसायचे आम्ही काय खायचं ? आमचं कर्ज कोण फेडणार आहे. परिस्थिती बेकार आहे, काय खावे काय करावे आता लेकरं शाळा शिकतात आम्हाला कोण बघतं.
भावूक होत त्यांनी सांगितले की, सरकारने आमच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. दुखणं आलं तर दवाखान्यात द्यायला दहा रुपये नाहीत. कानाने ऐकू येत नाही. डोळ्यांना दिसत नाही. ऑपरेशनला पैसे नाहीत. घरी दोन लेकरं आहेत. ते वेगळे आहेत आम्ही म्हातारा म्हातारी वेगळे आहोत. त्यांचे लेकरं शाळा शिकतात. पोरी लग्नाला आल्या तरी पैसे नाहीत. सरकारने आता काहीतरी करावं, असं म्हणत त्यांनी मदतीसाठी मागणी केली आहे.