
Ajit Pawar : उपमुख्यंत्री अजित पवार हे नेहमीच धडाडीचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कामाचा वेग आणि थेट बोलण्याची पद्धत यामुळे ते सगळीकडे ओळखले जातात. कामात कुचराई केल्यामुळे ते अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांवर संतापल्याचेही दिसले आहे. सध्या मात्र अजितदादा पत्रकार परिषद चालू असताना एका व्यक्तीने नोकरी द्या अशी मागणी करताच चांगलेच संतापले आहेत. त्यांनी समोरच्या व्यक्तीला बोलण्याची ही पद्धत नाही, असे म्हणत चांगलेच सुनावले असून नियमात बसत असेल तर शंभर टक्के लाभ मिळेल असे आश्वासनही दिले आहे.
अजित पवार यांनिा माध्यम प्रतिनिधींनी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची थेट उत्तरेही त्यांनी दिली. दरम्यान, पत्रकारांशी बोलत असतानाच एक व्यक्ती त्यांच्याकडे आली. दादा मला गव्हर्नेमेंट जॉब द्या, अशी मागणी करू लागली. त्यानंतर अजितदादांनी हे प्रकरण क्रीडा क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांनी तिथेच आमचे क्रीडामंत्री दत्ता भरणे आहेत. त्यांना तुम्ही जाऊन भेटा, असा सल्ला त्या तरुणाला दिला.
त्यानंतर समोरच्या व्यक्तीने आपले चालूच ठेवल्याने अजित पवार संतापले. तुला हीच जागा आठवली का? असा सवाल त्यांनी केला. त्यानंतरही समोरची व्यक्ती अजित पवार यांना बोलू लागली. यावर मात्र अजित पवार यांनी त्या व्यक्तीला मध्येच थांबवत ‘ए बोलायची ही पद्धत नाही. मी माहिती घेईल. मी कागद घेईन. तो व्यवस्थित पाहीन. तू बोलतोय त्यात तथ्य आहे का? हे बघेन. राज्य सरकारचं जे क्रीडाविषयक धोरण असेल त्यात तू बसत असशील तर शंभर टक्के तुझं काम होईल. तू सरकारच्या धोरणात बसत नसशील तर तुला तसं कळवण्यात येईल,’ असं थेट अजित पवार यांनी त्या व्यक्तीला समजावलं.
अजित पवार यांनी खडसावल्यानंतर मात्र समोरची व्यक्ती शांत झाली. त्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीन्याची चर्चा यावरही प्रतिक्रिया दिली. मी सोमवारी किंवा मंगळवारी माणिकराव कोकाटे यांचे म्हणणे ऐकून घेईल. त्यानंतर काय तो निर्णय होईल, असं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं.