मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचे नेत्यांना कडक निर्देश, कोणावर काय जबाबदारी?

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'नंदनवन' येथे शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. महायुतीचा महापौर बसवण्यासाठी या बैठकीत विशेष रणनीती आणि जागावाटपावर चर्चा करण्यात आली.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचे नेत्यांना कडक निर्देश, कोणावर काय जबाबदारी?
eknath shinde
| Updated on: Dec 25, 2025 | 5:16 PM

राज्यात आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या सत्तेच्या महासंग्रामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली रणनीती आक्रमक केली आहे. बुधवारी उशिरा रात्री मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांची आणि कोअर कमिटीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईवर महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी मायक्रो प्लॅनिंगवर भर देण्यात आला आहे.

जवळपास दोन ते तीन तास चाललेल्या या बैठकीत मुंबईतील २२७ प्रभागांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये कोणत्या प्रभागात जनतेचा आशीर्वाद मिळवणारा चेहरा उपलब्ध आहे, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महायुतीमध्ये लढताना शिवसेना आणि भाजपमध्ये जागांचे वाटप कसे असावे आणि मित्रपक्षांना कुठे सामावून घेता येईल, यावर प्राथमिक चर्चा झाली. तसेच कोणत्या वॉर्डमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे आणि कुठे भाजपचा प्रभाव आहे, याचे विश्लेषण करून विनिंग मेरिटनुसार जागा निश्चित करण्यात आली.

अनेक पदाधिकारी उपस्थित

या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित नेत्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, मुंबईची निवडणूक ही प्रतिष्ठेची लढाई आहे. प्रत्येक विभागातील जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी ही संबंधित नेत्याची आणि जिल्हाप्रमुखाची असेल. गटबाजी विसरून केवळ महायुतीचा विजय हेच ध्येय ठेवा,” असे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीला माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार दिलीप मामा लांडे, प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि मुंबईतील अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

लवकरच उमेदवारीबाबत घोषणा होणार

या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार दिलीप मामा लांडे म्हणाले, “मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. या बैठकीत प्रामुख्याने जागावाटप आणि प्रभागांमधील ताकद यावर चर्चा झाली. कोणते वॉर्ड महायुतीमध्ये आपल्या फेव्हरमध्ये आहेत आणि कोणते भाजपच्या वाट्याला जाऊ शकतात, याचा तांत्रिक आढावा घेतला गेला. मुंबईवर पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे आणि महायुतीचा महापौर बसवायचा आहे, हीच जिद्द सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे. अंतिम निर्णयाचे अधिकार आदरणीय शिंदे साहेबांना देण्यात आले असून, लवकरच ते उमेदवारीबाबत घोषणा करतील.”

दरम्यान मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक दशकांपासून असलेल्या ठाकरे गटाच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी शिंदे गटाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. लोकाभिमुख कामे आणि विकासकामांच्या जोरावर मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले आहे.