
विधानपरिषदेच्या पाच आमदारांची विधानसभेवर निवड झाल्याने या पाच जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी येत्या 27 मार्चला पोटनिवडणूक होत आहे. या प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक होत असल्याने पाचही जागा महायुतीला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात भाजप तीन, शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा मिळू शकते, असे बोललं जात आहे. विधानपरिषदेच्या एका जागेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून अनेक जण इच्छुक आहेत. मात्र यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आघाडीवर असल्याचे बोललं जात आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला विधानपरिषदेची एक जागा आली आहे. मात्र यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. धुळे – नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव यात आघाडीवर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिलेला शब्द पाळणार अशी पक्षात चर्चा रंगली आहे. तसेच माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचे नाव चर्चेत असून सातत्याने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर आक्रमकपणे टीका करणारं नेतृत्व म्हणून त्यांची सध्याची ठळक ओळख आहे.
यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांचेही नाव चर्चेत आहे. संजय मोरे हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी तसेच ठाण्याचे माजी महापौर आहेत. तर नागपूरच्या किरण पांडव यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. किरण पांडव हे विदर्भातील एकनाथ शिंदे यांचे मजबूत शिलेदार आहेत.
विधानपरिषदेतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदस्य आमश्या पाडावी हे अक्कलकुवा मतदार संघातून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे पाडवी यांची विधानपरिषदेतील जागा रिक्त झाली आहे. सव्वातीन वर्ष कार्यकाळ बाकी असलेल्या या जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी इच्छुक आहेत.