जरांगे मुंबईच्या दिशेने निघताच एकनाथ शिंदेंचे आवाहन, म्हणाले गणेशोत्सवात कोणतंही विघ्न…मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार का?
Eknath Shinde On Jarange Maratha Reservation March : मराठा आरक्षणासंबंधी सरकार सकारात्मक असून मराठ्यांना न्याय देताना इतर कोणत्याही समाजावर अन्याय होऊ दिला नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, मराठ्यांच्या आरक्षणाबाबते मुद्दे सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न केला. मराठा आरक्षणासंबंधी सरकार सकारात्मक आहे. मराठ्यांना न्याय देताना इतर समाजावर आम्ही अन्याय होऊ दिला नाही. कोणत्याही समाजाचं आरक्षण, सवलती आम्ही कमी केल्या नाही. पण जरांगेंनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. सरकार आणि पोलिसांप्रमाणे जरांगेंनीही तशी सहकार्याची भूमिका घ्यावी, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. गणेशोत्सवात कोणतंही विघ्न येता कामा नये, गणपती उत्सवामध्ये कोणाचीही गैरसोय होऊ नये असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज त्यांनी मुंबईच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरु केला आहे. आपण 19 सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचणार आहोत आणि पुन्हा एकदा मराठ्यांनीही सगळ्यांनी मुंबईत यावं असं म्हटलं होतं. त्यानंतर मराठ्यांना दिलेला शब्द मागे घेणार नाही. कोर्टाने परवानगी नाकारली तरी मी एकटाच मुंबईला येईल असं म्हणाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रत्येकाला लोकशाहीनं अधिकार दिला आहे. पण टीकेमध्ये समाजाची बाजू असावी, समाजाला न्याय देण्याची भूमिका ठिक आहे, पण त्यामध्ये राजकीय भूमिका असू नये. टीकेमध्ये तुम्ही राजकीय भूमिका घेऊ नये. आंदोलनाची, समाजाची लाईन सोडून राजकीय भूमिका घेऊ नये. एवढचं सांगतो की सरकारने कधीही आडमुठी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे सरकार काही देत नसेल तर ठिक आहे. पण सरकारने मराठा समाजासाठी जे जे देय्य आहे. ते ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. असं एकनाथ शिंदे म्हणाले.
ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील सकाळी सुमारे 11 वाजता एकटेच मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पाच दिवसांच्या दौऱ्यानंतर ते मुंबईत पोहोचून आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. मात्र, या आंदोलनासाठी परवानगी मिळण्यावर सस्पेंस कायम आहे. जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी याआधी दोन वेळा अर्ज केला होता, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली. आता तिसऱ्यांदा अर्ज करण्यात आला असून, त्यालाही परवानगी मिळण्याची शक्यता धूसर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनोज जरांगे पाटील मंगळवारी त्यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये 3 उपविभागीय पोलीस अधिकारी, 10 पोलीस निरीक्षक, 30 पोलीस उपनिरीक्षक आणि 200 सहायक पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.