भाजपच्या नेत्याच्या अटकेचा तो प्लॅन आणि शिवसेनेतील बंड, एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्या अटकेच्या कथित कटबाबत मोठा खुलासा केला आहे. शिंदे यांनी या कटातून स्वतःला दूर ठेवले आणि सरकारमधील त्यांच्या स्थितीचा वापर करून हा कट अयशस्वी केला.

भाजपच्या नेत्याच्या अटकेचा तो प्लॅन आणि शिवसेनेतील बंड, एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 11, 2025 | 11:54 PM

“प्रवीण दरेकर जी तुमचीही चौकशी लावली होती. मी तेव्हा तिथे सरकारमध्ये होतो, त्यामुळे मला माहिती आहे. तुम्हाला अटक करण्याचाही प्लॅन होता. पण मला या पापाचे धनी व्हायचे नव्हते. म्हणून मी माझा स्पीड वाढवला आणि टांगा पलटी करुन टाकला”, असा मोठा खुलासा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ते मुंबईत बोलत होते. मुंबईतील अभ्युदयनगर परिसरातील मुंबई जिल्हा बँकच्या नवीन शाखेचे उद्धाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी प्रवीण दरेकर हे एकनाथ शिंदेंच्या पाया पडले.

या कार्यक्रमावेळी एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उठावाबद्दल भाष्य केले. आज छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान दीन आहे त्यांना अभिवादन. आम्ही सरकार चालवलं. दादा, फडणवीस एक टीम म्हणून काम केले. मला आठवत आहे की मी मुख्यमंत्री असताना इथून देवेंद्र यांनी फोन केला होता की अभ्युदय नगरचा CND करायचा होता. मी घरी, गाडीत बसून, बाहेर कुठेही सही करतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

महायुती सरकार हे स्वप्न पूर्ण करणार

बँक चालवताना सर्वसामान्यांचे हित घेऊन चालवावी लागते आणि तुम्ही ते करताय. लाडक्या बहिणींची काळजी घेतली म्हणून ही मुंबई बँक देखील आमची लाडकी झाली आहे. मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र जी आणि अजित दादांना सांगितला की मुंबईचा मुंबईकर बेघर झाला आहे. अशा मुंबईकरना पुन्हा आणायचे असेल तर SRA प्रकल्प राबवायचे. स्वयंपूर्णविकास हे मुंबईसाठी वरदान ठरेल. बाळासाहेबांनी तेव्हा सांगितलं होत की ४० लाख झोपडपट्टीवासियांना घर देऊ. मात्र तेव्हा टिंगल उडवली. महायुती सरकार हे स्वप्न पूर्ण करणार, असे आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिले.

मी माझा स्पीड वाढवला आणि टांगा पलटी करुन टाकला

“महाविकास आघाडीच्या काळात चुना लागला. मराठी माणसाला उभे करण्यासाठी शिवसेना बाळासाहेबांनी उभी केली. प्रवीण दरेकर जी तुमचीही चौकशी लावली होती. मी तेव्हा तिथे सरकारमध्ये होतो, त्यामुळे मला माहिती आहे. मुंबई बँकेला जेरीस आणायचं असंही ठरवलं होतं. प्रवीण दरेकर यांना अटक करायची इथपर्यंतही मजल गेली. यात आणखी बऱ्याच लोकांची नावं होती. पण मला जेव्हा कळलं हे सर्व पापाचं काम चाललंय, पापाचा धनी होता कामा नये, म्हणून मी माझा स्पीड वाढवला आणि टांगा पलटी करुन टाकला”, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.