त्यामुळे आमचं एकदम चांगलं जमेल…; शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येताच एकनाथ शिंदेंचा जबरदस्त टोला

महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युती केली आहे. ही युती मुंबईतील दलित आणि मराठी मतांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

त्यामुळे आमचं एकदम चांगलं जमेल...; शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येताच एकनाथ शिंदेंचा जबरदस्त टोला
eknath shinde
| Updated on: Jul 16, 2025 | 2:51 PM

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडत आहे. एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी दलित मतांना आकर्षित करण्याच्या आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेसोबत युती केली आहे. मुंबईतील दलित आणि मराठी मतांचे समीकरण साधण्यासाठी ही युती झाल्याचे म्हटले जात आहे. आता यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले.

शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत. या सेना रस्त्यावर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सेना आहेत. बाळासाहेबांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे. त्यामुळे आमचं एकदम चांगलं जमेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

त्यामुळे आमचं एकदम चांगलं जमेल

“आज आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे. शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत. या सेना रस्त्यावर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सेना आहेत. एक बाळासाहेबांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे. त्यामुळे आमचं एकदम चांगलं जमेल. कारण आम्ही दोघंही मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून काम केलं. सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणून काम केलं. आता देवेंद्र फडणवीस हे सीएम आहेत आणि मी डीसीएस आहे म्हणजे डिडेकेटेड टू कॉमन मॅन आहे. शेवटी सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्ता हीच आपली सामाजिक बांधिलकी आहे. त्यामुळे तळागाळातील माणसाशी नाळ तुटता कामा नये हे नेहमी पाळण्याचे पथ्य आपण केलं. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे रक्ताच्या वारस आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे सर्वसामान्य माणूस उच्च पदावर पोहोचू शकला. यात मी सांगेन की तुमचा एकनाथ शिंदेही मुख्यमंत्री झाला”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

शिवशक्ती आणि भीमशक्ती कार्यकर्त्यांची फौज असलेली सेना

“आनंदराज आंबेडकर हे माझ्यासारखेच सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. त्यांनाही वारसा मोठा आहे. परदेशात जाऊन शिक्षण घेणारे ते भारतीय होते. साधी राहणी उच्च विचारसरणी हे त्यांनी पाळलं. सत्तेत गेल्यावर जनतेची सेवा करता येते. सत्ता जनतेसाठी राबावायची असते. शिवशक्ती आणि भीमशक्ती ही कार्यकर्त्यांची फौज असलेली सेना आहे. तुमची सेना रिपब्लिकन सेना आणि आमची सेना शिवसेना आहे. तुमच्याही पक्षात आणि आमच्याही पक्षात कोणी मालक किंवा कोणी नोकर नाही. सर्वजण कार्यकर्ते आहेत”, असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले.

कार्यकर्ता मोठा झाला तर पक्ष मोठा होतो

“बाळासाहेब नेहमी सांगायचे की सहकाऱ्यांना सवंगडी समजायचं. पण काही लोक त्यांना घरगडी समजू लागले आणि मग तिथेच गाडी फसली. आपले कार्यकर्ते हे आपले सहकारी आहेत. त्यांच्या जीवावर पक्ष मोठा होतो. कार्यकर्ता मजबूत आहे म्हणजे पक्ष मजबूत आहे. आता दोघं एकत्र आलो आहे. त्यामुळे कार्यकर्ता नेत्याला मोठं करतो. कार्यकर्ता मोठा झाला तर पक्ष मोठा होतो. सर्व निवडणुका जिंकून देतो. पण जेव्हा काही लहान मदत लागते तेव्हा त्या नेत्याने खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं”, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.