‘…अन् तेव्हा एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात पाणी आलं’, केसरकरांनी सांगितला शिवसेना फुटीवेळचा ‘तो’ प्रसंग

दीपक केसरकर यांनी मोठा दावा केला आहे, शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सीएमपदाची ऑफर दिली होती, असं त्यांनी म्हटलं आहे.

...अन् तेव्हा एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात पाणी आलं, केसरकरांनी सांगितला शिवसेना फुटीवेळचा तो प्रसंग
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 03, 2025 | 3:27 PM

जून 2022 मध्ये शिवसेनेत सर्वात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आलं, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देखील एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेला मिळालं.  दरम्यान त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? हे सांगताना माजी मंत्री दीपक केसरकर यांनी आता मोठा दावा केला आहे.

नेमकं काय म्हणाले केसरकर? 

पक्षात मतभेद झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे. मात्र पुन्हा युतीची स्थापना करा असं एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. मात्र उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या या मागणीला विरोध केला, तेव्हाच एकनाथ शिंदे यांनी पुढचं पाऊल उचललं, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्यावेळेला पक्षात मतभेद झाले त्यावेळेला एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी ती स्विकारली नाही. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी होतं. ते खूप भावनाप्रधान आहेत. कोणी असं म्हणण्याचं कारण नाही, की एवढा मोठा मनुष्य एखाद्या पदासाठी एवढा मोठा निर्णय घेऊ शकतो.

ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली तेव्हा ते म्हणाले की, तुम्हीच मुख्यमंत्री राहा पण ज्या विचारधारेसाठी महाराष्ट्रातील जनतेनं आपल्याला निवडून दिलं आहे, त्या जनतेच्या मताचा आदर करा, तुम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये युतीची स्थपाना करा आणि याला जेव्हा उद्धव ठाकरे यांनी नकार दिला, तेव्हा पुढचं पाऊल उचललं गेलं, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही कोणत्याही धर्मात भेदभाव करत नाही.
मोठी मालमत्ता असते तेव्हा त्यांचे परफेक्ट मॅनेजमेंट झालं पाहिजे. महिलांना प्रतिनिधित्व मिळालेलं नव्हतं, लांगुलचालन कोणी केलं हे सगळ्यांना माहिती आहे, असा टोलाही यावेळी तानाजी सावंत यांनी लगावला आहे.