Devendra Fadnavis: मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट, पंचनाम्यापासून ते वीज बिल माफीपर्यंत… फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा काय?
Devendra Fadnavis on Marathwada Drought : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ मुक्तीचा संकल्प सोडला. त्यांनी मराठवाड्यावर दुष्काळाचे गडद संकट असल्याचे सांगत सरकार करत असलेल्या उपाय योजनांविषयी मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानल्या जात आहे.

Devendra Fadnavis on Marathwada Drought :मराठवाड्यासमोर दुष्काळ आ वासून उभा ठाकला आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी, चारा संकट निर्माण झाले आहेत. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली. त्याचवेळी त्यांनी मराठवाडा दुष्काळ मुक्तीचा संकल्प सोडला. पीक पंचनाम्यापासून ते वीज बिलमाफीपर्यंतच्या उपाय योजनांची जंत्रीच त्यांनी वाचून दाखवली. यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट
मराठवाडा सातत्याने संघर्ष करत आहे. आपण जर बघितलं तर सर्वात जास्त दुष्काळाचे संकट हे मराठवाड्यावर घोंगावताना दिसते. आपल्याला कल्पना आहे की सुरुवातीच्या काळात पाऊस चांगला होता. असं वाटत होतं की पिकपाणी चांगलं असेल. पण पावसाचा खंड पडला. पिकांचं नुकसान झालं. दुष्काळाचं संकट आलं. पण याठिकाणी मी सर्व शेतकरी, कास्तकारांना आश्वासित करतो की कुठल्याही परिस्थितीत सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
दुष्काळाच्या नियमानुसार, 5 ऑक्टोबरनंतर पंचनामा आणि इतर आढावा घेतला जातो. पण आपण हे नियम बाजूला ठेवत आम्ही आतापासूनच प्रक्रिया सुरू केली आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे करण्यात येतील. NDRF ची मदत तर मिळलेच. पण त्याच्या आधी राज्य सरकार मदत पोहचेल. पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी आपण उपाय योजना सुरू केलेल्या आहेत. अल निनोच्या संकटाची अगोदरच कल्पना असल्याने वैरण विकासाअंतर्गत चाऱ्याची व्यवस्था आपण केली होती. त्यातंर्गत जनावरांसाठी चारा देण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
शेतकरी कर्जमाफी ते वीज बिल माफी
सरकारने अगोदरच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना सुरू केली. या योजनेचा सर्वाधिक लाभ मराठवाड्यात होत आहे. 15 लाखांवर शेतकरी या ठिकाणी कर्जमुक्त झाले आहेत. लवकरच उर्वरीत यादीही प्रसिद्ध होईल. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा निर्णय आपण घेतलाच आहे. पण त्यांची जुनी बिलं जवळपास 48 हजार कोटी रुपयांची ती सगळी बिलं रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना कुठलीही अडचण येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही
राज्य सरकारने सातत्याने एक संकल्प केला आहे की, मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. त्यासाठी वेगानं पावलं टाकण्यात आली आहे. भीमा खोऱ्यातील पाणी मराठवाड्यात आणण्याचा पहिला टप्पा झाला. आता मोठा टप्पा बाकी होता. फ्लड मिटिगेशनला जागतिक बँकेने मान्यता दिली. त्याची पहिली निविदा निघाली. इतर निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. त्यामाध्यमातून 30 TMC पाणी हे अतिरिक्त उपलब्ध होईल. ते मराठवाड्याकडे वळवण्यात येईल. धाराशिव, बीड, लातूर भागात हे पाणी आणण्यात येईल. संपूर्ण मराठवाडा हा गोदावरी खोऱ्यात येतो. हा भाग तुटीचा मानल्या जातो. दुष्काळाचं संकट कायम असतं. त्यामुळे आता कोकणातील उल्हास नदीतून पाणी उचलून आणून नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून ते मराठवाड्यापर्यंत आणण्यात येईल. त्याचा डीपीआर अंतिम टप्प्यात आहे. हा डीपीआर पूर्ण झाल्यावर उल्हास खोऱ्यातील जवळपास 70 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात आणता येईल असे फडणवीस म्हणाले.