ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना 5000 रुपयांची मदत… CM फडणवीसांकडून विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर, म्हणाले…
ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना 5000 रुपयांच्या मदतीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. विरोधकांच्या टीकेला आता मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पुण्यातील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच लोकार्पण झालं. या नव्या मेट्रो मार्गिकेमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण झालं. मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या 5000 रुपयांच्या मदतीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो मार्गिका ही महत्वाची होती. या मार्गात प्रचंड वाहतूक कोंडी असयाची. त्यामुळे निश्चितपणे लोकांचा वेळ वाचणार आहे. ही 23 किलोमीटरची मार्गिका असणार आहे. या मार्गिकेत 23 स्टेशन आहेत. पीपीपी पोलिसी तयार केली. पीपीपी अंतर्गत ही पहिली लाइन मान्य करण्यात आली. अनेक अडचणी या प्रकल्पात होत्या. या अडचणी दूर करत करत आज ही लाइन सुरू झालेली आहे. पुणेकरांना या मार्गिकेचा फायदा होईल. जवळपास 100 लोकोपायलट तयार केले आहेत. या सगळ्या महिला आहेत. ही पिंक लाईन आहे. या मार्गिकेचा एकूण स्टाफ हा 50 टक्के महिला आहे. या प्रकल्पाचं व्यवस्थापन होत असतानाही महत्वाच्या इंजिनीअर पदावर महिला होत्या’.
‘पुण्याच्या फेज 2 चं देखील भूमीपूजन करण्यात आलं आहे. पुण्यातील सर्व दिशांना कनेक्टिव्हीटी होणार आहे. एकूण सगळ्या लाइन पूर्ण झाल्यानंतर 120 किमीचं जाळं तयार होत आहे. हे जाळं पुरंदरपर्यंत देखील जाणार आहे. महायुतीच्या सरकारने अनेक प्रकल्पांचं जाळं तयार केलं. पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए भागात विकासाचा प्लान तयार केला जात आहे. या पंतप्रधान मोदींचे देखील आभार. त्यांनी पीएमआर ग्रोथ सेंटरसाठी 5 हजार कोटी रुपये देणार आहेत. त्यातून पुढील काम करणार आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.
विरोधकांच्या टीकेला फडणवीस म्हणाले, ‘ज्यांना मोठ्या गाड्यातून फिरायची सवय आहे. मोठ्या घरात राहायची सवय आहे. त्यांना 5 हजारांचं महत्त्वं कळणार नाही. ते शेतकऱ्यांना कळतं. ही अग्रीम मदत आहे. शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. आधीचा इतिहास काढला, तर शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत ही महायुती सरकारनेच दिली आहे. याआधीच्या सरकारने तोंडाला पान पुसली. तेच आता बोलत आहेत. पण ते काही बोलले तरी आम्ही मदत करू. पंतप्रधान मोदींनीही महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे. यामुळे मदतीचे आश्वासन दिलं आहे. त्यांची मदत आणि राज्याची मदत मिळून शेतकऱ्यांना पायावर उभे करू’.