
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने 1800 पानी आरोपपत्र दाखल केलय. मागच्या अडीच महिन्यांपासून हा विषय राज्यात गाजत आहे. राजकीय नेत्यांमध्ये यावरुन आरोप-प्रत्यारोपीच्या फैरी झडल्या. या प्रकरणी आता दाखल झालेल्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “हे संघटीत गुन्हेगारीचं जाळं आहे. आम्ही पहिल्यापासून सांगत होतो. आज ते सिद्ध झालंय. कागदोपत्री पुराव्याने घडलेल्या घटना, व्हिडीओ, ऑडिओ कॉल आणि सीसीटीव्ही फुटेज सर्व पुरावे मिळाले आहेत. त्यात हे नाव आलं आहे” असं धनंजय देशमुख म्हणाले.
“सीआयडी किंवा एसआयटीकडून ही सविस्तर माहिती मिळणार आहे. चार्जशीट दाखल केलं तरी तपास कसा झाला हे कळेल. सोनवणे आणि मुळे हे सीआयडीलाच माहीत असेल. तेच सांगतील. जसे गुन्हे घडले, कडी जशी जोडली त्याची माहिती आम्ही मुख्यमंत्र्यांना दिली होती” असं धनंजय देशमुख म्हणाले. सीआयडीच्या आरोपपत्रानुसार वाल्मिक कराडच या गुन्ह्यामध्ये मुख्य मास्टरमाइंड आहे. त्यानेच हे सर्व कारस्थान रचल्याच आरोपपत्रातून समोर येतय.
CID च्या आरोपपत्रात काय-काय म्हटलय?
या प्रकरणात आठ जणांवर मकोका कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडसह इतर आरोपींचा या गुन्ह्यामध्ये जो सहभाग आहे, तो सुद्धा मांडण्यात आला आहे. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या तिघांमध्ये हत्येच्या दिवशी आणि त्याआधी जे संभाषण झालं, नेमकं काय बोलणं झालं, संतोश देशमुख यांची हत्या कशी झाली? त्याची माहिती सीआयडीच्या आरोपपत्रातून देण्यात आली आहे.
ते पुरावे सीआयडीने आरोपपत्रात जोडले
संतोष देशमुख यांना मारहाण करताने जे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं ते सीआयडीच्या हाती लागलं. संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपी दिसतायत, ते पुरावे सीआयडीने आरोपपत्रात जोडले आहेत. वाल्मिक कराडला अवादा कंपनीकडून 2 कोटी रुपये खंडणी उकळायची होती. पण त्यामध्ये संतोष देशमुख अडथळा ठरत होते. म्हणून वाल्मिक कराडने हत्येच कारस्थान रचलं. हत्येमागच हेच कारण असल्याच सीआयडीच्या आरोपपत्रात म्हटलं आहे.