‘…तर न्यायाधीश त्यांच्यासोबत होळी खेळलेच नसते’; दमानियांच्या ट्विटवर धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

माझ्या भावाच्या पाठीवर पडलेले रक्ताचे काळे निळे डाग या लोकांनी पाहीले असते तर, या प्रकरणातील सक्तीच्या रजेवर असलेले पोलीस अधिकारी न्यायाधिशांबरोबर होळी खेळले नसते, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.

...तर न्यायाधीश त्यांच्यासोबत होळी खेळलेच नसते; दमानियांच्या ट्विटवर धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
dhananjay deshmukh
| Updated on: Mar 15, 2025 | 3:42 PM

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक झाली आहे, सीआडीकडून या प्रकरणात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. मात्र या प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी काही फोटो ट्विट करत सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांसोबत सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी होळी साजरी केल्याचे म्हटले आहे. या फोटो आणि व्हिडिओची ‘टीव्ही 9 मराठी’ पुष्टी करत नाही.

दरम्यान आता यावर संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या भावाच्या पाठीवर पडलेले रक्ताचे काळे निळे डाग या लोकांनी पाहीले असते तर, या प्रकरणातील सक्तीच्या रजेवर असलेले पोलीस अधिकारी न्यायाधिशांबरोबर होळी खेळले नसते, या लोकांची होळी बघून मला त्रास झाला हे अत्यंत चुकीचे आहे. असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मात्र त्याला पकडण्यात अद्यापही यश आलेलं नाही. यावर देखील धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे सापडल्यानंतर या प्रकरणातील अनेक बाबी समोर येणार आहेत. आरोपी जर लवकर नाही सापडला तर मी काहीतरी वेगळा निर्णय घेणार आहे. फरार आरोपीकडील माहिती पुरावे त्यानी नष्ट केले तर त्याला जिम्मेदार कोण असणार? असा प्रश्नही यावेळी धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे अंजली दमानियांचा दावा? 

अंजली दमानिया यांनी ट्विट करत असा दावा केला होता की,  केजला होळीचा कार्यक्रम असताना तिथे राजेश पाटील जे एक निलंबित अधिकारी आहेत आणि दुसरे प्रशांत महाजन हे दोन्ही अधिकारी आले आहेत. ते सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांसोबत होळी खेळताना दिसतात. हे बघितल्यावर मला अतिशय धक्का बसला.