
राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. त्यातच बीड जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या परळी वैजनाथ आणि परभणीच्या गंगाखेड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विरोधकांचे तगडे आव्हान मोडून काढत मुंडे यांनी आपला बालेकिल्ला राखला आहे. या विजयाला धनंजय मुंडे यांनी जनतेचा न्याय असे संबोधले आहे.
नगरपरिषदेच्या विजयानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते कमालीचे आक्रमक आणि भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. नगर परिषद निवडणुकीत परळी वैद्यनाथ जि. बीड सह गंगाखेड जि. परभणी नगर परिषद निवडणुकीची जबाबदारी असलेल्या व प्रचार केलेल्या दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय. न्यायालयाच्या निकालात निर्दोष आणि विजयी! जनतेच्या न्यायालयातही विजयी! माझ्या माय बाप जनतेचे पुन्हा एकदा सहृदयी आभार!, असे ट्वीट धनंजय मुंडे यांनी केले आहे.
प्रचारादरम्यान परळीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला. माझ्या परळीला बदनाम करणाऱ्यांना मायबाप जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे. ज्यांनी टीका केली, त्यांना जनतेने मतपेटीतून चपराक लगावली आहे असे धनंजय मुंडे यांनी ठणकावून सांगितले. परळीसोबतच गंगाखेडमध्येही राष्ट्रवादीने मोठे यश संपादन केले आहे.
जनतेचे अनेक अनेक आभार!
नगर परिषद निवडणुकीत परळी वैद्यनाथ जि. बीड सह गंगाखेड जि. परभणी नगर परिषद निवडणुकीची जबाबदारी असलेल्या व प्रचार केलेल्या दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय.
न्यायालयाच्या निकालात निर्दोष आणि विजयी!
जनतेच्या न्यायालयातही विजयी!
माझ्या माय…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 21, 2025
तर दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी निकालाचा स्वीकार करताना आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. मी जिल्ह्याची पालकमंत्री नसतानाही कार्यकर्त्यांनी दिलेली ही झुंज कौतुकास्पद आहे. सत्तेची रसद पाठीशी नसताना भाजप कार्यकर्त्यांनी जिद्दीने निवडणूक लढवली. आम्ही आमची शक्ती दाखवून दिली आहे, काही जागा थोडक्यात निसटल्या असल्या तरी भाजपचा पाया भक्कम आहे,” असा विश्वास पकंजा मुंडे यांनी व्यक्त केला.
दरम्यान बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांनी आपला करिष्मा दाखवत परळी आणि परभणीतील गंगाखेडमध्ये निर्विवाद विजय मिळवला आहे. परळीत एमआयएम आणि इतर विरोधकांनी दिलेले आव्हान मुंडेंनी मोडीत काढले. तर शेजारील गंगाखेड नगर परिषदेतही राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून त्यांनी आपले राजकीय वजन सिद्ध केले. हा विजय विरोधकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
तर दुसरीकडे, गेवराईमध्ये भाजपने आपला गड राखत पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, धारूर आणि माजलगावमध्ये मतदारांनी शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक वाढवली. या दोन्ही ठिकाणी अत्यंत चुरशीच्या लढतीत निसटते निकाल समोर आले आहेत. या निकालांनी महायुतीचे बळ वाढवले असले, तरी काही जागांवरील चुरस पाहता आगामी निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी दरम्यानचा संघर्ष अधिक टोकदार होण्याची चिन्हे आहेत.