धनगर समाजाचा विराट मोर्चा, निशाण्यावर रत्नाकर गुट्टे, आंदोलक म्हणाले, वांझोटी… परभणीत एल्गार

parbhani dhangar community morcha : परभणीत धनगर समाजाने विराट मोर्चा काढला. या मोर्च्यातून रत्नाकर गुट्टे यांना टार्गेट करणयात आलं.

धनगर समाजाचा विराट मोर्चा, निशाण्यावर रत्नाकर गुट्टे, आंदोलक म्हणाले, वांझोटी... परभणीत एल्गार
| Updated on: Jul 12, 2026 | 3:15 PM

परभणीच्या गंगाखेड शहरातील सामाजिक कार्यकर्ता महेश बिडगर या तरुणाला सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत काही तरुणांनी मारहाण केली होती. या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या घटनेनंतर गंगाखेड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा निषेध म्हणून गंगाखेड शहरात महेश बिडगर यांच्या समर्थनात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात दीपक बोराडे यांनी देखील हजेरी लावली.

दीपक बोराडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. बोराडे म्हणाले, ‘महेश बिडगर यांच्यावर केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत. तसेच बिडगर यांनी दिलेली तक्रार रीतसर नोंदवून आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी बोराडे यांनी केली आहे. पोलीस राज्यकर्त्यांचं हातातलं बाहुलं झालं आहे. ते सदसद्‌बुद्धीचा वापर करत नाहीत. या खात्यात देखील तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी यायला पाहिजे. तेव्हाच सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल असं, त्यांनी म्हटलं आहे. ही घटना पोलीस स्टेशन मधील कॅमेऱ्यात कैद झाल्याचं समोर येत आहे. त्या आधारे या सगळ्या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे’.

‘जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत संघर्ष सुरू ठेवणार असल्याचं बोराडे म्हणाले. या मोर्चात ओबीसी नेते सहभागी न झाल्याने दीपक बोराडे यांनी राग व्यक्त केला आहे. हिंदूत्वाच्या रथाला ओढायला धनगर लागतो. हिंदुत्ववादी नेत्यांना आमदार खासदार करायला आणि ओबीसीचा गाडा ओढायला धनगर लागतो. मात्र जेव्हा धनगरावर अन्याय होतो, तेव्हा ना हिंदुत्ववादी संघटना पुढे येतात ना ओबीसी संघटना, त्यामुळे येत्या काळात आपला कोण आणि शत्रू कोण हे सांगणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी आमदार रत्नाकर गुटे यांच्यावर नाव न घेता वांझोटी असा उल्लेख करत टीका केली. त्यामुळे आता धनगरांच्या पोरांनी निवडणुका हाती घ्यायला पाहिजे. तेव्हाच हा अन्याय दूर होईल, असं वक्तव्य केलं.

रामप्रभू मुंडे काय म्हणाले?

माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे म्हणाले, ‘माझ्या येणाऱ्या पिढीला शिक्षण मिळालं पाहिजे. परळीचा जाणारा रोड 25 वर्षांपासून झाला नाही. रस्त्यांना तडे गेले आहेत. हे टक्केवारीचे तडे आहेत. या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. रस्त्याचे बोगस काम महेश यांनी उघडकीस आणलं. हे बोगस काम थांबले पाहिजे, या मागणीसाठी मारहाण करण्यात आली. त्यांना किती लाज वाटली पाहिजे. अनेक प्रश्न महेश यांनी मांडले. ते आवाज दाबण्याचं काम करत आहे. मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे’

Follow Us