DMart च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, सर्व ग्राहक बघतायत सोमवारची वाट, नेमकं कारण काय?
डी-मार्टच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे सर्व ग्राहक सोमवारची वाट बघत आहे. कारण Q1 ने निकाल जाहीर केला आहे.

डी-मार्ट या रिटेल साखळीचे संचालन करणाऱ्या अॅव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडने आर्थिक वर्ष 2026-27 च्या एप्रिल-जून तिमाहीत दमदार आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 11.33 टक्क्यांनी वाढून 860.44 कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत कंपनीने 772.81 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल-जून तिमाहीतील ऑपरेटिंग महसूल 14.9 टक्क्यांनी वाढून 18,794.53 कोटी रुपये झाला. आर्थिक वर्ष 2025-26 च्या याच कालावधीत हा महसूल 16,359.70 कोटी रुपये होता. वाढता महसूल आणि नफ्यातील वाढ यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे दिसून येत आहे.
अॅव्हेन्यू सुपरमार्ट्सचे प्रमुख प्रवर्तक ज्येष्ठ गुंतवणूकदार राधाकिशन दमानी आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, कंपनीतील प्रवर्तकांची एकूण हिस्सेदारी 74.50 टक्के आहे. याशिवाय परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडे 9 टक्के, म्युच्युअल फंडांकडे 6.8 टक्के आणि सार्वजनिक भागधारकांकडे 7.6 टक्के हिस्सा आहे. कंपनीत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड आणि एसबीआय म्युच्युअल फंड यांनीही गुंतवणूक केली आहे.
सोमवारी कंपनीच्या शेअरकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष
तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर सोमवारी कंपनीच्या शेअरकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असणार आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना अॅव्हेन्यू सुपरमार्ट्सचा शेअर 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 4,083.05 रुपयांवर बंद झाला होता.
शेअरच्या कामगिरीचा विचार केला तर, गेल्या सहा महिन्यांत शेअरने 7.30 टक्के, तर 2026 या वर्षात आतापर्यंत 9.83 टक्के परतावा दिला आहे. मात्र, गेल्या एका वर्षात शेअर 2.03 टक्क्यांनी घसरला आहे. या कालावधीत सेन्सेक्समध्ये 6.76 टक्क्यांची घसरण झाली होती. दीर्घकालीन कामगिरी पाहता, दोन वर्षांत शेअर 15.63 टक्क्यांनी घसरला, तीन वर्षांत 8.58 टक्के परतावा दिला, तर पाच वर्षांत 20.84 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मात्र, हा परतावा याच कालावधीत सेन्सेक्सने दिलेल्या 48.07 टक्के परताव्यापेक्षा कमी आहे.
दरम्यान, ही माहिती केवळ वृत्ताच्या स्वरूपात असून ही कोणत्याही प्रकारची गुंतवणुकीची शिफारस नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असल्याने कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
