
राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी दिपक बोऱ्हाडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांचं जालन्यात गेल्या 11 दिवसांपासून उपोषण सुरू आहे, दरम्यान आज आकराव्या दिवशी सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली आहे. मंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे.
धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. याच मागणीसाठी आता दिपक बोऱ्हाडे हे जालन्यात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज आकरावा दिवस आहे, सरकारच्या शिष्टमंडळानं बोऱ्हाडे यांची भेट घेतली असून, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे.
दरम्यान यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं की, दीपक भाऊ यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे, खरं म्हणजे आम्ही लवकर यायला पाहिजे होतं. पण मागील काही दिवसापासून राज्यातील परिस्थिती आपण पाहातात, पावसाचं खूप मोठं संकट आहे. सगळीकडून आम्हाला फोन येत आहेत, मी जळगाव दौरा आटपून येत असताना मला देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला, आता तुम्ही जालन्याला जा असं त्यांनी मला सांगितलं. आमची प्रामाणिक इच्छा आहे, देवा भाऊंनी प्रयत्न केले, मात्र अनेक दिवसापासून र आणि ड चा विषय सुरू आहे. आपल्यावरचा हा अन्याय दूर करायचा आहे आणि तो झालाच पाहिजे. परंतु थोडा वेळ लागत आहे. ही वस्तुस्थिती आहे, असं यावेळी गिरीश महाजन यांनी बोऱ्हाडे यांना म्हटलं.
उपोषण सोडण्याची विनंती
दरम्यान यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी बोऱ्हाडे यांना उपोषण सोडण्याची देखील विनंती केली आहे. इतकं दिवस उपोषण केलं, आता लांबून चालणार नाही कारण आपल्याला समाजाला न्याय द्यायचा आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा असं वाटतं की आपण उपोषण सोडलं पाहिजे, माझी आपल्याला विनंती आहे की आपण आता या ठिकाणी उपोषण सोडावं, अशी विनंती महाजन यांनी बोऱ्हाडेंना केली.