
Satara Phaltan Female Doctor Death Case : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात नोकरीवर असणाऱ्या महिला डॉक्टरने एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी तिने तळहातावर पीएसआय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिला डॉक्टरने थेट पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांवरच आरोप केल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आले असून निलंबित पोलीस अधिकारी बदने याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, आता या प्रकरणात साताऱ्यातील पोलीस अधिकाऱ्याने महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी बदने आणि मृत महिला डॉक्टर यांच्यात काहीतरी वाद होता, असे सांगितले आहे
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पोलीस अधिकारी तुषार दोषी यांनी टीव्ही 9 मराठीला महत्त्वाची माहिती दिली आहे. सध्या बदने फरार आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची चार पथके तैनात करण्यात आली असून बदनेचा शोध घेतला जातोय, अशी माहिती दोषी यांनी दिली आहे. सोबतच पोलीस आणि महिला डॉक्टरमध्ये वाद अनेकदा वाद झाल्याचेही दोषी यांनी सांगितले. शेवटी तपासाअंती सत्य समोर येईल. डॉक्टरला कोणी तीला प्रवृत्त केले आहे का? याबाबत तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
या घटनेचा सर्व बाजूने तपास सुरू आहे. एका संशयित आरोपींला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. लवकरच दुसऱ्या आरोपीलादेखील ताब्यात घेतले जाईल. दुसऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न सुरू आहे. आमच्या अधिकाऱ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्याचा अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती दोषी यांनी दिली.
संबंधित डॉक्टर युवतीने फलटण ग्रामीण पोलिसांबाबत तक्रार केली होती. फिटनेस सर्टिफिकेट बाबतच्या या तक्रारी होत्या. त्यामुळे पोलीस आणि या डॉक्टर युवतीमध्ये वाद होता. या प्रकरणाचा तपास केल्या नंतर पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले होते, असे दोषी यांनी सांगितले.
मृत महिला डॉक्टरने आरोग्य प्रशासनाशी काही पत्रव्यवहार केला होता. या पत्रव्यवहारात खासदार या शब्दाचा उल्लेख आहे. याबाबत बोलताना, खासदार हा विषय पूर्णपणे वेगळा आहे खासदारांचे नाव हे मयत डॉक्टरने लिहिलेल्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पत्रात आहे. सध्याच्या गुन्ह्याशी डॉक्टरने दिलेल्या पत्राशी कोणताही संबंध दिसत नाही, असे दोषी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आता या प्रकरणात नेमकी कोणती नवी माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.