
ठाणे महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई केली जात आहे. मात्र या कारवाईला नागरिकांचा विरोध होताना दिसत आहे. दिव्यातील खान कंपाउंड परिसरात कारवाई सुरु असताना नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. पालिकेची कारवाई थांबवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दिव्यात ठाणे महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम हटवण्याचे काम सुरु आहे. याआधी ठाणे महापालिकेने संबंधित मालकांना नोटीशीही दिल्या होत्या, त्यानंतर आता पालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. 13 इमारतींवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र याला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. सध्या खान कंपाउंड परिसरात मोठ्या प्रमाणात महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत.
दिव्यातील अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत कोर्टानेही आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दिव्यासह ठाणे शहर आणि इतरही ठिकाणी अनधिकृत बांधकाम हटविण्याचे काम सध्या सुरु आहे. या कारवाईसाठी मोठा फौजफाटाही तैणात करण्यात आला आहे. मात्र तरीही दिव्यात शेकडो महिलांनी रस्त्यावर उतरत ही कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे.
यावेळी बोलताना आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितले की, ‘आम्ही बऱ्याच दिवसांपासून येथे राहत आहोत. आम्हाला तोडफोडीबाबत कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. पालिकेकडून थेट कारवाईला सुरुवात झाली. आमची इरातर पूर्णपणे तयार झालेली आहे. आम्हाला वीज कनेक्शनही देण्यात आले आहे. इमारत अनधिकृत आहे म्हटल्यावर आम्हाला वीज कनेक्शनही द्यायला नको होते असंही विधान आंदोलक महिलांनी केलं आहे.