
सर्वसामान्यांप्रमाणे राजकीय जीवनात काम करणाऱ्या व्यक्तींची सुद्धा काही नाती असतात. सणावाराच्या निमित्ताने ती नाती जपली जातात. आज देशात सर्वत्र भाऊबीज साजरी होत आहे. त्या निमित्ताने राजकीय क्षेत्रातही भाऊबीजेचा सण साजरा होतोय. आमदार चित्रा वाघ आणि प्रसाद लाड दोघांनी आज भाऊबीज साजरी केली. दोघेही भारतीय जनता पार्टीत आहेत. याआधी हे दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते. भावाला म्हणजे प्रसाद लाड यांना ओवाळल्यानंतर मीडियाशी बोलताना चित्रा वाघ यांनी ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर भाऊबीजेच्या निमित्ताने राजकीय भाष्य केलं.
“आज आमच्या देवाभाऊंमुळे दोन भाऊ एकत्र येत आहेत. आपल्या सगळ्यांचे वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे वरुन देवाभाऊंना आशिर्वादच देत असतील. तुमच्यामुळे, लोकांना दाखवण्यासाठी का असेना, राजकारणासाठी का असेना, पण आज हे दोघे एकत्र आलेले आहेत. मला तर सगळ्यात जास्त आनंद त्यांच्या बहिणींसाठी आहे. खरोखर देवाभाऊंचे आभार मानले पाहिजेत, ज्या बहिणी इतकी वर्ष भावाचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी वंचित होत्या. या आज त्या ठिकाणी आहेत” असं चित्रा वाघ म्हणाल्या.
‘आमचे नाते रक्ताच्या पलीकडचे’
“आमच्या नात्याला कोणाची दृष्ट लागू नये. आनंदाचा क्षण आहे. ही नाती बळ देतात. पवित्र नातं आहे. आमचे नाते रक्ताच्या पलीकडचे आहे. आम्हाला आनंद आहे. आज माझा परिवार त्याला घ्यायला खाली गेला. माझ्या सोबत हा असतो. आमच्या नात्यात कधी खंड पडला नाही. दिखावेपणाचं नाटक केलं नाही” असं चित्रा वाघ म्हणाल्या.
निवडणूक भाजप म्हणून नाही श्रमिक म्हणून लढलो
‘माझ्यासाठी ही आनंदाची दिवाळी आहे. ताईची आमदार म्हणून पहिली दिवाळी आहे’ असं प्रसाद लाड म्हणाले. “मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल. आम्हाला आव्हानच नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजेच शिवसेना. मागची एक निवडणूक छोटी होती. बेस्ट निवडणुकीत मी एकटा लढलो. मुंबईची जनता सुशिक्षित जनता आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही केले.यावेळी 31 हजाराचा बोनस मिळाला आहे. ठाकरे ब्रँडचं आव्हान नाही. आम्ही निवडणूक लढवत असताना भाजपा नाही, श्रमिक म्हणून लढलो. मला वाटते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उभी केली, त्याला मदत देवाभाऊ यांनी केली” असं प्रसाद लाड म्हणाले.