जमिनीचा व्यवहार, कमिशनच्या बहाण्याने बोलावलं अन्…; डॉक्टरांसोबत धक्कादायक कृत्य घडलं

Doctor Sanjay Teli Case: जमिनीच्या व्यवहारातून डॉक्टरांचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. नंतर गोणीत बांधून मृतदेह धरणात फेकला आहे. पण चौथ्या दिवशी गूढ उकललं आहे.

जमिनीचा व्यवहार, कमिशनच्या बहाण्याने बोलावलं अन्...; डॉक्टरांसोबत धक्कादायक कृत्य घडलं
| Updated on: Nov 23, 2026 | 11:11 PM

जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात गेलेल्या डॉ. संजय मनोहर तेली यांच्या खून प्रकरणाचा चौथ्या दिवशी उलगडा झाला आहे. जमिनीच्या व्यवहारातून डॉक्टरांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह गोणपाटात बांधून बहुळा धरणात फेकल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती आहे.

पोलिसांनी धरणात शोधमोहीम राबवून गोणीत बांधलेला डॉक्टरांचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी मुख्य आरोपी राहुल धर्मराज पाटील आणि त्याला मदत करणारा सालदार संजय भील या दोघांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. संजय तेली हे 18 नोव्हेंबर रोजी एक कोटी 25 लाख रुपयांच्या जमिनीच्या व्यवहारासाठी पाचोरा तालुक्यातील गोरडखेडा येथे गेले होते. जमिनीचा व्यवहार घडवून आणणाऱ्या एजंटला कमिशन देण्याच्या बहाण्याने त्यांना कन्नड येथून गोरडखेडा येथे बोलावण्यात आले होते. मात्र तेथे पोहोचल्यानंतर ते अचानक बेपत्ता झाले.

Loading...

बराच वेळ संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. डॉक्टर बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन गोरडखेडा परिसरात आढळले. तसेच त्यांची कारही याच परिसरात मिळून आली. या संशयास्पद बाबींमुळे पोलिसांनी परिसरातील व्यक्तींची चौकशी सुरू केली. तपासादरम्यान राहुल धर्मराज पाटील याच्यावर संशय बळावला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने डॉक्टरांच्या हत्येची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने डॉ. तेली यांचा मृतदेह गोणपाटात बांधून बहुळा धरणात फेकण्यात आला होता. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी राहुल पाटील याला त्याचा सालदार संजय भील याने मदत केल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी बहुळा धरण परिसरात शोधमोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान गोणीत बांधलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तो बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

या जमिनीच्या व्यवहारासाठी आरोपीला 80 लाख रुपये दिले होते, असा दावा डॉ. तेली यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या व्यवहारातून नेमका कोणता वाद निर्माण झाला आणि त्यातून हत्येपर्यंत प्रकरण कसे पोहोचले, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी डॉक्टरांच्या कुटुंबीयांनी केली आहे. या प्रकरणी राहुल धर्मराज पाटील आणि संजय भील या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीच्या व्यवहारातील आर्थिक देवाणघेवाण, हत्येमागील नेमके कारण आणि इतर संभाव्य सहभाग यांचा पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us