
राज्यात सध्या भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची सातत्याने चर्चा सुरु आहे. याप्रकरणावरुन संताप व्यक्त होत असतानाच आता डोंबिवलीमध्येही एका भोंदू बाबाचे पितळ उघडं पडलं आहे. डोंबिवलीतील एका भोंदू बाबाने सर्वसामान्यांच्या श्रद्धेचा फायदा घेत त्यांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीच्या लग्नातील दोष उतरवण्याच्या नावाखाली एका वयोवृद्ध पित्याची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दीपक सावंत (६२) असे या भोंदूबाबाचे नाव असून त्याला विष्णू नगर पोलिसांनी कल्याणमधून बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे एक वयोवृद्ध गृहस्थ आपल्या मुलीच्या लग्नात वारंवार येणाऱ्या अडचणींमुळे अत्यंत चिंतेत होते. अनेक प्रयत्न करूनही विवाह जुळत नव्हता. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते. त्यांच्या याच हतबलतेचा फायदा दीपक सावंत याने घेतला. त्याने स्वतःला सिद्ध पुरुष किंवा बाबा असल्याचे भासवून या पित्याची भेट घेतली.
तुमच्या मुलीला कोणाची तरी कडक नजर लागली आहे. घरामध्ये बाधा असून विधी केल्याशिवाय लग्नाचे कार्य पार पडणार नाही आणि मुलीचे भविष्य धोक्यात येईल, अशी भीती त्याने या पित्याच्या मनात घातली होती. पोटच्या मुलीच्या भविष्यासाठी हा पिता या भोंदूच्या जाळ्यात अडकला. यानंतर भोंदू दीपक सावंत याने विधीच्या नावाखाली प्रथम २ हजार रुपये दक्षिणा घेतली. त्यानंतर मुख्य विधी करण्यासाठी त्याने काही अटी घातल्या.
मला दागिन्यांचा विधी करायचा आहे, असे सांगून त्याने पीडिताला सोन्याचे ब्रेसलेट आणि चांदीची लक्ष्मीची नाणी घेऊन येण्यास सांगितले. विधी सुरू असताना त्याने हे सर्व दागिने एका लाल रुमालात बांधले. मंत्रोच्चाराचे नाटक करून त्याने पीडिताचे लक्ष विचलित केले. यानंतर अत्यंत सराईतपणे त्याने दागिन्यांचा रुमाल आपल्या झोळीत टाकला आणि त्याऐवजी हुबेहूब दिसणारा, पण आतमध्ये दागिने नसलेला दुसरा लाल रुमाल पीडिताच्या हातात सोपवला. हा रुमाल देवाच्या कोनाड्यात ठेवा आणि सहा महिन्यांनीच उघडा, तरच विधी पूर्ण होईल, अशी ताकीद देऊन तो घाईघाईने तेथून पसार झाला.
तो आरोपी भोंदू बाबा निघून गेल्यावर पीडिताला काहीतरी काळं-बेरं असल्याचा संशय आला. त्यांनी तो रुमाल उघडून पाहिला असता, त्यात दागिने नसल्याचे पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ विष्णू नगर पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तैनात करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत दीपक सावंत याला कल्याण परिसरातून ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. यावेळी तपासात काही धक्कादायक बाबीही समोर आल्या. आरोपी दीपक सावंत हा सराईत भामटा असून, त्याच्यावर मुंबई आणि टिटवाळा पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तो वेगवेगळ्या नावांनी वावरत असे. विशेषतः वृद्ध व्यक्ती किंवा गरजू महिलांना आपले लक्ष (Target) बनवत असे. पोलिसांनी आरोपीला कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विष्णू नगर पोलिसांनी या घटनेच्या निमित्ताने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शिक्षित समाजातही अजूनही अंधश्रद्धेचा फायदा घेऊन लुटले जाण्याचे प्रकार घडत आहेत. कोणत्याही व्यक्तीने दैवी शक्तीचा दावा करून पैसे किंवा दागिने मागितल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. अशी फसवणूक झाल्यास लाजू नका, तर तातडीने पोलिसांकडे तक्रार करा, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.