आई सफरचंद घेऊन येतो, मुलाने आईला बँकेच्या पायऱ्यांवर बसवलं अन् तिथेच… जे घडलं ते पाहून पोलिसांचीही झोप उडाली

डोंबिवलीत भरदिवसा ८० वर्षीय वृद्ध महिलेची ३ लाखांची सोन्याची माळ चोरट्यांनी चलाखीने लांबवली. चप्पल आणि बिस्किटे पिशवीत देऊन भामट्यांनी आजींचा विश्वास संपादन केला आणि दागिने घेऊन पसार झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

आई सफरचंद घेऊन येतो, मुलाने आईला बँकेच्या पायऱ्यांवर बसवलं अन् तिथेच... जे घडलं ते पाहून पोलिसांचीही झोप उडाली
old women AI photo
| Updated on: Mar 20, 2026 | 7:42 AM

कल्याण-डोंबिवली परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यातच आता त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना आपले सॉफ्ट टार्गेट बनवण्यास सुरुवात केली आहे. डोंबिवलीतील वर्दळीच्या पंडित मदन मोहन मालवीय रस्त्यावर रविवारी दुपारी दीडच्या सुमारास एका ८० वर्षीय वृद्ध महिलेची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या वृद्ध महिलेची ३ तोळ्यांची सोन्याची माळ लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळजनक उडाली आहे.

नेमकी घटना काय?

कल्याण पूर्वेकडील आत्मारामनगर परिसरात राहणाऱ्या नर्मदा घाडिगावकर (८०) यांची प्रकृती रविवारी अचानक बिघडली. त्यांचा मुलगा प्रदीप घाडिगावकर हे कामानिमित्त सिंगापूर येथे वास्तव्यास असतात. ते सध्या सुट्टीवर असल्याने आईसोबत होते. आईला तातडीने उपचाराची गरज असल्याने त्यांनी डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात नेले होते. उपचार पूर्ण झाल्यावर हे दोघेही मायलेक रिक्षाने घरी जाण्यासाठी निघाले. त्याच वेळी संधी साधत चोरांनी डाव साधला.

प्रदीप यांनी त्यांच्या रस्त्यात आईला थोडा वेळ विश्रांती मिळावी म्हणून एका खाजगी बँकेच्या पायऱ्यांवर बसवले. आई, मी दोन मिनिटात सफरचंद आणि काही मिठाई घेऊन येतो, असे सांगून ते जवळच असलेल्या दुकानात गेले. अवघ्या काही मिनिटांच्या या अंतरात दोन अज्ञात भामट्यांनी नर्मदा यांच्यावर पाळत ठेवली. त्यांनी वृद्ध मातेजवळ जाऊन जवळच चप्पल आणि रोख पैसे वाटप सुरू आहे, तुम्ही तिथे चला असे सांगत त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला.

नर्मदा यांनी सुरुवातीला नकार दिला, पण चोरट्यांनी आम्ही तुमचे चप्पल आणि गळ्यातील माळ पिशवीत सुरक्षित ठेवतो, नाहीतर तिथे गर्दीत कोणीतरी काढून घेईल असे त्यांना सांगितले आणि त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर चोरट्यांनी मोठ्या चलाखीने त्यांच्या गळ्यातील सुमारे ३ लाख रुपये किंमतीची सोन्याची माळ काढून घेतली. त्यांनी नर्मदा यांच्या समोरच एक पिशवी काढली आणि त्यात माळ व चप्पल टाकल्याचे भासवले. प्रत्यक्षात त्यांनी सोन्याची माळ स्वतःच्या खिशात टाकली आणि पिशवीत फक्त चपलांचा जोडा आणि बिस्किटांचे दोन पुडे भरून पिशवी त्यांच्या हातात टेकवली. तुमचे दागिने सुरक्षित आहेत असे सांगून ते दोघेही तिथून पसार झाले.

सराईत गुन्हेगारांचा शोध सुरु

यानंतर काही वेळातच त्यांचा मुलगा प्रदीप तिथे परतला. यावेळी आईने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांना संशय आला. त्यांनी तातडीने पिशवी उघडून पाहिली असता, त्यांना धक्काच बसला. त्या पिशवीत सोन्याची माळ नव्हती. यानंतर परिसरात शोधाशोध केली असता आरोपींचा पत्ता लागला नाही. अखेर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून सध्या परिसरात सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. सध्या पोलीस या सराईत गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us