Varsha Usgaonkar : लोकांनी माझ्यावर दगड मारले…वर्षा उसगांवकर यांनी सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलेलं?
Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्षे राज्य केलं आहे. त्यांनी मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीतमध्येही नाव कमावलं आहे. आपल्या सौंदर्यामुळे आणि सहजसुंदर अभिनयामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. वर्षा उसगांवकर यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग घडला होता, ज्याची आठवण आजही त्यांच्या मनात कायम आहे. औरंगाबादमध्ये शिक्षण घेत असताना केवळ गुडघ्यापर्यंतचा स्कर्ट परिधान केल्यामुळे काही लोकांनी त्यांच्यावर चक्क दगडफेक केली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा धक्कादायक अनुभव सांगितला.
स्कर्ट घातल्यामुळे सहन करावा लागला त्रास
वर्षा उसगांवकर यांचा जन्म गोव्यात झाला. कॉमर्सची पदवी घेतल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. अभिनयाचं शिक्षण घेण्यासाठी त्या औरंगाबादला गेल्या होत्या. तिथे दोन वर्षे त्यांनी नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. याच काळात त्यांना एका विचित्र आणि त्रासदायक प्रसंगाचा सामना करावा लागला. वर्षा यांना स्कर्ट घालायला आवडायचं. त्या काळात त्या गुडघ्यापर्यंत लांबीचा स्कर्ट परिधान करायच्या. मात्र, औरंगाबादमध्ये सितार शिकण्यासाठी जात असताना त्यांच्या कपड्यांवरून काही लोकांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.
वर्षा उसगांवकर यांनी सांगितला प्रसंग
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत वर्षा उसगांवकर म्हणाल्या की, ‘जेव्हा मी तो शॉर्ट ड्रेस घालून पहिल्यांदा स्टेजवर गेले, तेव्हा कोणीतरी जोरात शिट्टी वाजवली आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मला स्कर्ट घालायला आवडायचं. तो मिनी स्कर्टसुद्धा नव्हता, गुडघ्यापर्यंत असायचा. त्यामुळे माझ्यासाठी तो कल्चरल शॉक होता. शिट्ट्या सोडाच, माझ्यावर त्यांनी दगड मारले.’
वर्षा उसगांवकर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात रंगभूमीवरही काम केलं. ‘ब्रह्मचारी’ हे त्यांचं गाजलेलं नाटक होतं. या नाटकात त्यांनी अतिशय वेगळ्या प्रकारचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. पहिल्यांदाच असा पोशाख घालून रंगमंचावर गेल्यानंतर प्रेक्षकांनी जोरदार शिट्ट्या वाजवल्या होत्या. त्यामुळे त्या काहीशा घाबरल्या होत्या. या अनुभवाचाही उल्लेख त्यांनी या मुलाखतीत केला आहे.
