कधी करण जोशी, तर कधी करीम मोहम्मद, डोंबिवलीत वावरायचा त्रिनामी सैतान, अंगावर काटा आणणारी घटना समोर

डोंबिवलीत रेल्वे नोकरी आणि कंत्राटाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या आणि पतीची १० लाखांची फसवणूक करणाऱ्या रहीम पद्मसी उर्फ करण जोशीचा जामीन अर्ज फेटाळला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कधी करण जोशी, तर कधी करीम मोहम्मद, डोंबिवलीत वावरायचा त्रिनामी सैतान, अंगावर काटा आणणारी घटना समोर
dombivali crime
| Updated on: Mar 24, 2026 | 8:56 AM

डोंबिवली शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतःची ओळख लपवून तीन वेगवेगळ्या नावांनी वावरणाऱ्या एका नराधमाने रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार बलात्कार केला. इतकेच नाही, तर तिच्या पतीला रेल्वेचे कंत्राट मिळवून देतो असे सांगून १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची गंभीर घटनाही समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

रहीम पद्मसी उर्फ करीम मोहंमद जैन उर्फ करण जोशी असे या आरोपीचे नाव असून तो शहरात आपली खरी ओळख लपवून वावरत होता. आरोपीने पीडित महिलेला रेल्वेत नोकरी लावण्याचे प्रलोभन देऊन आपल्या घरी बोलावले. तिथे तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने अनेक वर्षे पीडितेवर लैंगिक अत्याचार केले.

हा नराधम केवळ लैंगिक शोषणापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्याने पीडितेच्या पतीलाही आपल्या जाळ्यात ओढले. रेल्वेचे मोठे कंत्राट मिळवून देतो असे सांगून त्याने पतीकडून वेळोवेळी १० लाख रुपये उकळले. जेव्हा पतीला आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. त्याने पत्नीशी याबद्दल चर्चा केली, तेव्हा पत्नीने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. हे ऐकून पतीला मोठा मानसिक धक्का बसला.

यावेळी तपासादरम्यान या प्रकरणातील आणखी एक भीषण पैलू समोर आला आहे. आरोपी हा व्याजावर पैसे देण्याचा बेकायदा धंदा करतो. अनेक गरजू महिलांना त्याने पैसे दिले होते. मात्र, व्याजाची वसुली करण्याऐवजी तो महिलांकडून शरीरसुखाची मागणी करायचा, असा आरोप काही महिलांनीही केला आहे. या त्रासाला कंटाळून आता अनेक महिला पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत.

न्यायालयाने फेटाळला जामीन

याप्रकरणी ८ मार्च रोजी रामनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला. त्याने अटकेपासून वाचण्यासाठी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, फिर्यादीचे वकील महेश शिवदास यांनी न्यायालयात मांडलेला प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. रामनगर पोलीस आता या त्रिनामी नराधमाचा कसून शोध घेत आहेत.

Follow Us