
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे. “आमच्या हैद्राबाद गॅझेटच्या जीआरविरोधात कोर्टात गेलात तर आम्ही 1994 च्या जीआर विरोधात कोर्टात जाणार. जर मराठ्यांचे वाटोळे करण्याचे काम भुजबळने केले तर ओबीसीचे 16 टक्के आरक्षण गेलेच म्हणून समजा. मुळात तुम्ही 16 टक्के आरक्षण हे मराठ्यांच्या वाट्याचे खात आहात” असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. “त्यामुळे त्यांनी आमच्या जीआरला चॅलेंज दिले की आम्ही 1994 च्या जीआरला चॅलेंज करणार” असं जरांगे पाटील बोलले.
“आमच्या समाजातील काही लोकं आमच्यावर टीका करत आहेत. पण त्यांनी आजपर्यंत समाजाला काहीही दिलेले नाही.
राज्यात कुणीही आरक्षणासाठी आंदोलन, उपोषण, मोर्चा काढला की चर्चेला हेच लोकं जाणार. यांचे कपडे, गाड्या, चष्मे आणि सेंटचा वासच मराठ्यांनी पाहिला आहे. मात्र आमच्या आंदोलनानंतर मिळालेले यश आता यांना बघवत नाही. त्यामुळे यांची वळवळ सुरु झालीय” अशी मनोज जरांगे यांनी विनोद पाटील यांच्यावर टीका केली. “यातील एक माजी मंत्र्याचा मावस भाऊ आहे (राजेश टोपेंचा भाऊ संजय लाखे पाटील) आणि दुसरा सांगलीतील माजी गृहमंत्र्यांचा पाहुणा आहे. यांनी आजवर कोर्ट कागद,चर्चा, मंत्र्यांच्या भेटीगाठी एवढच केलंय” असं जरांगे पाटील म्हणाले.
‘आता कायदा सुव्यवस्था पाहणार नाही’
“सरकारने आता जीआर मध्ये काहीही घालायचे नाही आणि काढायचे नाही. जर का यात काही गडबड केली तर मग मात्र महाराष्ट्र बंद करणार. आम्ही आता कायदा सुव्यवस्था पाहणार नाही” असं मनोज जरांगे पाटील चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बोलले.
‘आमच्या निर्णयात कसलाही बदल करायचा नाही’
“कोणत्याही बैठका घेऊदेत पण आमच्या निर्णयात कसलाही बदल करायचा नाही. जर का काही बदल केलात, तर मात्र राज्यातील सर्व रस्ते बंद करुन टाकणार” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी उपसमिती बैठकीवर दिला.