डॉ. गौरी गर्जे यांच्या शवविच्छेदन अहवालाने खळबळ, तीन शब्दांनी संशय वाढला, नेमकं दडलंय काय?

डॉ. गौरी गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू 'अनैसर्गिक' असून गळ्यावर दाब पडल्याने झाल्याचे नमूद आहे. डॉ. राजेश ढेरे यांनी ही माहिती दिली.

डॉ. गौरी गर्जे यांच्या शवविच्छेदन अहवालाने खळबळ, तीन शब्दांनी संशय वाढला, नेमकं दडलंय काय?
Gauri Garje
| Updated on: Nov 24, 2025 | 4:06 PM

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे- गर्जे यांच्या मृत्यूप्रकरणी नवनवीन अपडेट समोर येत आहेत. डॉ. गौरी यांची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला जात आहे. आता या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. डॉ. गौरी गर्जे यांच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. डॉ. गौरी गर्जेंचा यांचा मृत्यू अनैसर्गिक (Unnatural) असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे, अशी महत्त्वाची माहिती डॉ. राजेश ढेरे यांनी दिली आहे.

शवविच्छेदन अहवालात काय?

डॉ. राजेश ढेरे यांनी नुकतंच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉ. गौरी गर्जे यांच्या शवविच्छेदन अहवालातील महत्त्वाचा तपशीलाची माहिती दिली. या प्राथमिक अहवालात ओपिनिअन रिझर्व्हड एव्हिडन्स ऑफ नेगेचर कम्प्रेशन ऑफ नेक (Opinion Reserved Evidence of Nature Compression of Neck) असा उल्लेख आहे. याचा अर्थ गौरीचा मृत्यू गळ्यावर दाब पडल्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र यातील अंतिम माहिती राखून ठेवण्यात आली आहे. या शवविच्छेदन अहवालावर अनैसर्गिक असा शेरा देण्यात आला आहे. मात्र सध्या तिच्या मृत्यूचे अंतिम कारण राखून ठेवण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पूर्णपणे वैज्ञानिकरित्या अभ्यास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या निर्देशानुसार, घटनास्थळावरून काही वस्तू पुरावे म्हणून जशाच्या तशा ठेवण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक वाटलेल्या गोष्टींचे नमुने (सॅम्पल) प्रयोगशाळेत (लॅब) पाठवण्यात आले आहेत. लॅबचे रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यू नेमका कोणत्या कारणांनी झाला, याबद्दलची सविस्तर माहिती दिली जाईल आणि अंतिम अहवाल (Final Report) तयार केला जाईल, असेही डॉ. ढेरे यांनी सांगितले.

अधिक सखोल तपास सुरु

डॉ. ढेरे आणि त्यांचे पथक आता पोलीस स्टेशनला जाऊन उर्वरित माहितीवर चर्चा करणार आहेत. यावेळी मृतदेहावरील जखमा, खुणा किंवा इतर तपशील संबंधित पोलीस अधिकाऱ्याला कळवण्यात येणार असून, त्यानंतर रिपोर्टमध्ये सर्व माहिती समाविष्ट करून अंतिम अहवाल दिला जाईल, असेही डॉ. ढेरे यांनी सांगितले.

दरम्यान डॉ. गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी हा आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर पोलिसांनी गौरी गर्जे यांचे पती अनंत गर्जे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. डॉ. ढेरे यांच्या प्राथमिक अहवालानंतर आता पोलिसांना या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करावा लागणार आहे.